रजनीकांत पुण्यात!
तो आला, त्याने पहिले आणि कोणीही त्याला ओळखले नाही…रजनीकांत काल पुण्यात आला असताना हेच घडले. आज सगळ्या पेपरमध्ये रजनीच्या शूटींगच्या बातम्या आहेत. मात्र काल दापोडीच्या हॅरीस पुलावर वाहतूक थांबली होती त्यावेळी फार कमी लोकांना माहित होतं, कि रेल्वेच्या पुलावर उभी असलेली व्यक्ती तमिळ सिनेसृष्टीचा राजा आहे. मला जेव्हा कळले, कि रजनीकांत पुण्यात तेही एवढ्या जवळ आला आहे, त्यावेळी मी तिथे न जाणे शक्यच नव्हते. एवढी धडपड करून गेलो आणि काही मिनिटे मी त्याला जवळून पाहत होतो. योगायोगाने काल सुट्टी आल्याने मला हवा तेवढा वेळ तिथे थांबू शकत होतो. जमावाचा एक भाग बनून मी त्याला हाक मारत होतो. त्याने माझ्याकडे पहिले आणि हात हलविला. त्याच्या दृष्टीने मी गर्दीतील एक व्यक्ती होतो आणि त्याने दाखल घ्यावी असे मी काही केलेलेही नाही. मात्र चित्रित होणाऱ्या दृश्यासाठी साधारणतः अर्धा तास उभा असताना लोकं ओरडत होते. एकमेकांशी धक्काबुक्की करत होते. तरीही तो शांतपणे उभा होता. मला त्याचे कौतुक वाटले. शंभर-सव्वाशे लोकं गोंधळ घालत असताना भर उन्हात थंडपणे वाट पाहणे ही साधी गोष्ट नाही. रेल्वेची जी वॅगन त्याला घेऊन जात होती तिला लोकांचा वेध पडला होता. वेध घालणाऱ्या त्या वेड्यांमध्ये मीही एक होतो.

आयशप्पथ!
इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज एकात्मतेची शपथ घेतली. मंत्रालयात झालेल्या या समारंभाला संपूर्ण मंत्रिमंडळ हजर होते. आता ही शपथ घेतल्यानंतर, यांनी एकमेकांशी एकात्मता पाळली तरी राज्यावर मोठे उपकार होतील!
ते आणि आपण
मुंबईत झालेल्या स्फोटांचे आणि हल्ल्यांचे प्रकरण अद्याप संपलेले नाही. या घटनेच्या वार्तांकनासाठी गेली दोन दिवस अनेक वाहिन्या आणि वर्तमानपत्रांचे वार्ताहर शब्दशः जीवाच्या कराराने घटनास्थळी थांबलेले आहेत. त्यांच्यापैकी काही जण केवळ नशिबाने वाचले तर काही जखमी झाले आहेत. त्यांचे खरोखर कौतुकच केले पाहिजे.
या घटनेचे वार्तांकन अपेक्षेप्रमाणे जगभरच्या माध्यमांनी केले. मात्र या वार्तांकनात महत्त्वाचा फरक दिसून येतो. पाश्चात्य माध्यमांनी या घटनेची छायाचित्रे प्रकाशित करताना कुठेही मृतदेह, खंडीत झालेले देह, भयभीत चेहरे येू दिलेले नाहीत. हल्ल्यांची तीव्रता वाचकांपर्यंत नेण्यासाठी निर्जीव वस्तूंचाही वापर करता येऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. आपल्याकडे मात्र रडके चेहरे, मृतदेह, जखमी व्यक्ती किंवा मृतांच्या नातेवाईकांची शोकमग्न छायाचित्रे यांची रेलचेल आहे. मृत व्यक्तीचाही मान कायम ठेवला पाहिजे, हे आपण कधी शिकणार?




