Devdesh’s Weblog

दिसामाजी काहीतरी लिहावे

Archive for ऑक्टोबर 2006

पाकिस्तानमधील रंगमंचावर पुण्याचा “राब्ता’

without comments

बातमीचे छायाचित्र पुणे, ता. 26 ः भारत आणि पाकिस्तानदरम्यान सांस्कृतिक संबंध बळकट करण्याच्या दिशेने नाट्य क्षेत्रातही प्रयत्न होत आहेत. देवाणघेवाणीच्या या प्रयत्नांमध्ये पुण्यातील एका संस्थेने खारीचा वाटा उचलला आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेऊन, यंदा पाकिस्तानातूनच संस्थेला निमंत्रण मिळाले आहे. त्यानिमित्ताने एका मराठी नाटककाराचे नाटक पाकिस्तानात सादर होणार आहे, हे विशेष! दक्षिण आशियातील नाट्य चळवळीचे एक आधारस्तंभ मानले जाणारे रफी पीर या दिवंगत लेखकाच्या स्मृत्यर्थ पाकिस्तानात दर वर्षी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात येतो. त्यात पुण्यातील “राब्ता’ ही नाट्य संस्था गेल्या तीन वर्षांपासून प्रयोग सादर करत आहे. संस्थेचे प्रमुख सय्यद सईद अहमद “सकाळ’शी बोलताना म्हणाले, “”रत्नाकर मतकरी यांचे “पोर्ट्रेट’ हे नाटक यंदा आम्ही प्रयोगासाठी निवडले आहे. येत्या दहा आणि अकरा नोव्हेंबरला त्याचे प्रयोग करण्यात येतील. सुमारे चाळीस देशांतील नाट्य संस्था या महोत्सवात प्रयोग सादर करणार आहेत. त्यात भारतातीलही तीन ते चार संस्था आहेत.” मात्र, सलग तिसऱ्या वर्षी प्रयोग सादर करण्याची संधी मिळालेली “राब्ता’ ही देशातील कदाचित एकमेव संस्था असावी, असेही श्री. अहमद यांनी नमूद केले. “राब्ता’च्या वतीने श्री. अहमद यांच्यासह मानसी लोणकर, अतीत भंडारी, आदिल अत्तार आणि अशरफ खान हे पाकिस्तानला जाणार आहेत. संस्थेच्या कलावंतांनी याआधी सादर केलेल्या “जिस लाहौर नही देखा’ आणि “नकाब’ या नाटकांना महोत्सवात मोठा प्रतिसाद मिळाला होता. यातील “नकाब’ हे नाटक रफी पीर यांनीच लिहिलेले असून, अणुबॉंबच्या भीषणतेवर ते आधारित आहे. त्याचे आतापर्यंत गुजरात, बंगळूर व दिल्लीतही प्रयोग झाले आहेत. याच नाटकाचा 25 वा प्रयोग पंजाबमध्ये करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या आयोजकांनी यंदा स्वतःहून “राब्ता’ला प्रयोग करण्यास आमंत्रित केले. रफी पीर यांची आठ नाटके असून या सर्वांचे प्रयोग होणार आहेत. यातील सात नाटके पाकिस्तानी कलावंत सादर करणार आहेत; मात्र केवळ एक नाटक “राब्ता’ला सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पुढील वर्षी त्यांचे प्रयोग होतील, अशी माहितीही श्री. अहमद यांनी दिली. (२७ ऑक्टो. ०६ रोजी प्रकाशित बातमी. त्यानंतर या संस्थेने पाकिस्तानचा यशस्वी दौराही केला आणि त्यांच्या नाटकाला मोठा प्रतिसादही  मिळाला.)

Written by देविदास देशपांडे

ऑक्टोबर 27, 2006 at 1:27 pm