Archive for डिसेंबर 2006
मराठी पाऊल पडते…हॉलिवूडमध्ये!
पुणे, ता. 4 ः “श्वास’पासून महाराष्ट्रात मराठी चित्रपट उभारी घेत असताना एका मराठी व्यक्तीने थेट हॉलिवूडमध्ये पाय रोवले आहेत. त्यांनी निर्मिती केलेला पहिला चित्रपट तयार असून, विविध चित्रपट महोत्सवांत चित्रपटाने प्रशंसाही मिळविली आहे. व्यावसायिक यश मिळाल्यास हा चित्रपट भारतातही झळकण्याची शक्यता आहे.
निखिल कामकोलकर यांनी “इंडियन काऊबॉय’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाशी संबंधित कलांवतांतही मुख्यतः मराठी व्यक्तींचा समावेश आहे, हे विशेष. मूळचे मराठी असलेले निखिल यांचे बालपण हैदराबादेत गेले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1988 मध्ये ते “युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन’मध्ये पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी संगणक विज्ञानात पदवी संपादन करतानाच चित्रपटविषयक प्रशिक्षणही घेतले.
कामकोलकर यांना “मायक्रोसॉफ्ट’च्या एका उपकंपनीत नोकरी मिळाली. या काळात “गॉडझिला’, “श्रेक’ आणि “टायटॅनिक’ यांसारख्या चित्रपटात “स्पेशल इफेक्ट’ पुरविण्यात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर स्वतःच्या मनाप्रमाणे चित्रपट करायचा ध्यास घेतला. त्यातूनच “इंडियन काऊबॉय’ या विनोदात्मक प्रेमपटाची निर्मिती झाली. कामकोलकर यांनी स्वतःच्याच कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करताना त्यात प्रमुख भूमिकाही केली आहे. दीप काटदरे, शीतल सेठ आणि संड्रा ओक्ली हे यातील अन्य मुख्य कलावंत. फेब्रुवारीत हा चित्रपट अमेरिकेत झळकेल.
कामकोलकर यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी चित्रपटाबाबत माहिती दिली. मुख्य प्रवाहातील आणि समांतर चित्रपटांसाठीच्या विविध महोत्सवांत हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यात मिळालेल्या प्रतिसादामुळे खूप काही शिकायला मिळाले, असे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या “मराठी’पणाबाबत त्यांनी सांगितले, की अमेरिकेत दक्षिण आशियाई लोकांची वस्ती मोठी आहे. त्यातून आमचा चित्रपटांच्या ध्यासाने एकत्र आलेल्यांचा गट आहे. सांस्कृतिक अथवा राष्ट्रीय ओळख महत्त्वाची नाही. मात्र, चित्रपटाचा नायक दीप काटदरे आणि संगीतकार कर्ष काळे, हे दोघेही अमेरिकेत जन्मलेले व तेथेच वाढलेले आहेत.
———-
मराठी चित्रपटांची ओळख अमेरिकेत!
तुमच्या निर्मितीवर मराठी चित्रपटांचा प्रभाव कितपत आहे, असा प्रश्न कामकोलकर यांना विचारला होता. त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्याच शब्दांत ः
मराठी चित्रपटांचा प्रभाव माझ्यावर आहेच. मात्र हैदराबादमध्ये असताना मुख्यतः हिंदी आणि तेलुगू चित्रपटांचा प्रभाव होता. हैदराबादेत मराठी चित्रपट फारसे नसायचे. मराठी नाटक आणि चित्रपटांची ओळख मला अमेरिकेत गेल्यावरच झाली. सिएटलमध्ये “मायक्रोसॉफ्ट’साठी काम करताना मी एका मराठी नाटकात छोटीशी भूमिकाही केली होती. मॅडिसन येथे शिकतानाच माझी भारतीय चित्रपटांशी खरी ओळख झाली. तिथेच मी सत्यजित राय यांचे चित्रपट पाहिले. भारतात असताना मला त्यांचे नावही माहीत नव्हते.
——-