Devdesh’s Weblog

दिसामाजी काहीतरी लिहावे

Archive for मे 2007

उपग्रह वाहिन्यांचा “सुपरस्टार’ मोहरा

without comments

62f8.jpg

तमिळनाडू म्हणजे चित्रपटमय राजकारण आणि राजकारणमय चित्रपटांचा प्रदेश. त्यामुळेच राज्यात कोणतीही राजकीय घडामोड घडत असताना चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांचे क्षेत्र मागे राहणे शक्‍य नाही. “दिनकरन’वरील हल्ल्यानंतर करुणानिधी यांच्या कुटुंबात फेरजुळणी होत असतानाच राज्यातील वाहिन्यांमध्येही नव्या रणनीतींची आखणी सुरू झाली आहे. त्यात प्रमुख खेळाडू आहेत एम. करुणानिधी, राज टीव्ही आणि सन टीव्ही. करुणानिधी यांच्यासाठी आतापर्यंत “सन टीव्ही’ दिमतीला होते. आता त्यांचा स्वतःचा “कलैग्नर टीव्ही’ येऊ पाहत आहे. या वाहिन्यांच्या स्पर्धेत एक मोहरा आहे सुपरस्टार रजनीकांत.

सन टीव्हीची स्थापना झाली पंधरा वर्षांपूर्वी, 1992 मध्ये. करुणानिधी यांच्या राजकीय प्रभावामुळे तिचा बघता बघता विस्तार झाला आणि या क्षणी तमीळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये वीस उपग्रहवाहिन्या आणि सात “एफएम’ वाहिन्या “सन’ समूहाच्या मालकीच्या आहेत. या समूहाची उलाढाल आहे सोळा हजार कोटी रुपयांची! तमिळनाडूत तरी या समूहाचा मुख्य स्पर्धक आहे “राज टीव्ही’. “राज टीव्ही’ची स्थापना आहे 1994 ची व त्यांच्या सध्या तरी दोनच वाहिन्या आहेत. त्यामुळे करुणानिधी यांच्या सहकार्याने “सन टीव्ही’ला नामोहरम करण्याची संधी साधण्याचा “राज टीव्ही’चा प्रयत्न आहे. तीन नव्या वाहिन्या सुरू करण्यासाठी “राज’ समूहाचा अर्ज तीन वर्षे माहिती व प्रसारण मंत्रालयात पडून होता. दयानिधी मारन यांच्या राजीनाम्यानंतर एक आठवड्याच्या आत त्याला मान्यता मिळाली, यावरून तेथील वाऱ्याची कल्पना यावी.

करुणानिधी आणि “राज’ची ही योजना उधळून लावण्यासाठी “सन’चे सर्वेसर्वा मारन कुटुंबीयांना आधार आहे रजनीकांतच्या लोकप्रियतेचा! रजनीकांत हा तमीळ वाहिन्यांसाठी हुकमाचा एक्का आहे. त्यातच योगायोगाने त्याच्या बहुतांश “हिट’ चित्रपटांचे हक्कही “सन’कडेच आहेत. जयललिता यांच्याशी रजनीकांतचे वितुष्ट असल्यानेच विधानसभा निवडणुकांच्या काळात त्याचे चित्रपट दाखविण्याचा सपाटा “सन टीव्ही’ने लावला होता. तेव्हा यशस्वी झालेली हीच रणनीती वापरून “कलैग्नर टीव्ही’ला आव्हान देण्यात येईल. त्या दृष्टीने “शिवाजी द बॉस’ हा रजनीकांतचा आगामी चित्रपट “सन’च्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे.

“नायक’, “हिंदुस्थानी’ यांसारख्या संदेशात्मक चित्रपटांचा दिग्दर्शक शंकर याने “शिवाजी द बॉस’चे दिग्दर्शन केले असून, याही चित्रपटात काहीतरी राजकीय किंवा सामाजिक भाष्य केले असण्याची जोरदार शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यात या चित्रपटानंतर रजनीकांत राजकारणात येण्याचीही शक्‍यता आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना (आणि हा वर्ग मोठा आहे) आकर्षित करून “कलैग्नर टीव्ही’ आणि “राज टीव्ही’ या दोघांवर मात करण्याचे “सन’चे धोरण आहे. त्यासाठी इतिहासही “सन’च्या बाजूने आहे. 1996 मध्ये रजनीकांतच्या “अन्नामलाई’ चित्रपटातील दृश्‍ये “सन’वरूनच वारंवार प्रक्षेपित करून करुणानिधींनी सत्तेकडे वाटचाल केली होती. त्यामुळेच “शिवाजी’चे उपग्रह, डीव्हीडी आणि ऑडियो हक्क घेण्यासाठी सन टीव्हीची “रिलायन्स’शी स्पर्धा चालू असून, त्यासाठी तब्बल 80 कोटी रुपयांपर्यंत किंमत मोजण्याची त्यांची तयारी आहे.

Written by देविदास देशपांडे

मे 31, 2007 at 11:40 सकाळी