इरास्मस मुंडुसची बातमी
परदेशी विद्यार्थ्यांसाठी युरोपीय महासंघाने नवीन शिष्यवृत्यांचा कार्यक्रम तयार केला आहे. त्यासाठी शिष्यवॄत्यांच्या रकमेतही वाढ केली आहे. यासंबंधीची बातमी मी दिली. ती सकाळमध्ये छापून आली. या बातमीचा एक फोटो आणि ती बातमी येथे देत आहे. बातमी तुम्ही इथेही वाचू शकता.
—————————
भारतीय विद्यार्थ्यांसाठी युरोपचे प्रांगण अधिक मोठे परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अमेरिकेबरोबरच युरोपमध्येही वाढीव संधी उपलब्ध होणार आहेत. युरोपीय महासंघाने संघाबाहेरील विद्यार्थ्यांसाठी वाढीव निधी उपलब्ध करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या घोषणेचा फायदा मुख्यतः भारत, चीन आणि इराणच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे सन 2008 पासून या योजनेच्या अंमलबजावणीस सुरवात होणार आहे. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युरोपीय महासंघातर्फे “इरास्मस मुंडुस’ हा कार्यक्रम राबविला जातो. तीन वर्षांपूर्वी 2004 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला. त्याअंतर्गत 2008 पर्यंत 2300 विद्यार्थ्यांनी युरोपमधील विद्यापीठांत शिक्षण घेतले. या निधीत वाढ करण्याची घोषणा महासंघाने केली आहे. युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांतील विद्यार्थी; तसेच विकसनशील देशांतील परदेशी विद्यार्थ्यांसाठी, अशा दोन्ही शिष्यवृत्त्यांचा त्यात समावेश आहे.
परदेशी विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेची सध्या “फुलब्राईट शिष्यवृत्ती’ दिली जाते. मात्र युरोपीय महासंघाची योजना त्या शिष्यवृत्तीला आव्हान देण्याची शक्यता आहे. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यात अधिक वाटा ठेवण्यात आला आहे. या योजनेत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी “इंडिया विंडो’ नावाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पदवीधारक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रतिष्ठित युरोपीय विद्यापीठांमध्ये संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती भारतातील युरोपीय महासंघाच्या प्रतिनिधी मंडळ कार्यालयातील अधिकारी राकेशसिंह यांनी दिली.
———–
इरास्मस मुंडुस आकड्यांमध्ये
० आतापर्यंतची तरतूद ः 23 कोटी युरो (सुमारे 1288 कोटी रुपये)
० पुढील वर्षीपासूनची तरतूद ः 95 कोटी युरो (सुमारे 5320 कोटी रुपये)
० पदव्युत्तर (मास्टर्स) पातळीवरचे 80 हून अधिक अभ्यासक्रम. (यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून)
० युरोपमधील 323 शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्याची सोय.
० भारतातील 900 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची तरतूद. (त्यातील 400 शिष्यवृत्त्या यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी).
० विविध देशांतील 19 विद्यापीठांशी सहकार्याची योजना.