तू जपून टाक पाऊल जरा…
गुजरातमधील एका मुलाने त्याच्याहून वयाने मोठ्या असलेल्या एका ब्रिटिश महिलेशी विवाह केला…पुण्यातील एका युवकाने इंडोनेशियातील एका युवतीशी लग्न केले. गेल्याच वर्षी मुंबईतील एका मुलीने चॅटिंगद्वारे ओळख झालेल्या एका पाकिस्तानी युवकाशी लग्न केले….
इंटरनेटच्या प्रसाराबरोबर “होतकरु’ प्रेमी-प्रेमिकांनी नवीन माध्यम उपलब्ध झाले आणि पूर्वी कोणी कल्पनाही केली नसेल अशी ही जोडपी दिसू लागली. खासकरून चॅटिंग आणि आता “सोशल नेटवर्किंग’च्या साइटस्मुळे हा सगळाच प्रकार आपल्या स्वतःबाबतही कधीही घडू शकतो, असं प्रत्येकालाच वाटतंय. “लव ऍट फर्स्ट साईट’ची जागा आता “लव ऍट फर्स्ट बाईट’ घेऊ लागली आहे. बट….खरंच असं असतं का? म्हणजे या “सायबर लव स्टोरी’ची अखेर “अन् ते आयुष्यभर सुखात राहिले,’ असा होऊ शकतो का? कोणीतरी “चॅट’वर भेटतं, हळूच “फ्रेंड लिस्ट’मध्ये जातं…”इ-मेल’ येतात जातात आणि काही काळाने “नेट’चा आंतरपाट दूर होतो…एकविसाव्या शतकातील ही प्रेमकथा होऊ शकते का?
नेटवरील यशस्वी झालेल्या प्रेमप्रकरणांइतकीच अयशस्वी, नव्हे “डिझॅस्टरस्’ प्रकरणांच्या कहाण्याही मोठ्या संख्येने आहेत. “तू जपून टाक पाऊल जरा,’ सारखंच “तू जपून वापर माऊस जरा,’ असं म्हणायची वेळ आली आहे. खासकरून आपला जोडीदार सोमर दिसत नसल्याने (काही ठिकाणी तर मुलगी म्हणून चॅट करणारी व्यक्ती मुलगा निघाल्याचेही घडले आहे) सगळाच “ब्लाइंड गेम’ चालू आहे. अन् तरीही आपला “नेट’च आजचा मेघदूत होऊन यक्ष आणि विरहीणीची मने जोडतोय. मॅचमेकिंगपासून डेटिंगपर्यंत सगळं काही इथं आहे…या सगळ्याचा वापर करायचा तर हवा थोडासा सावधपणा…
(`सकाळ’मध्ये ३० ऑक्टो. रोजी आलेल्या एका स्फुटाची ही ‘नेट’की आवृत्ती)