आधुनिक सिंड्रेलाचा ‘सायबर’ शोध
तो एक वेबडिझाइनर…ती एक शिकाऊ पत्रकार. दोघांची भेट घडण्याचे तसे काही कारणही नाही. तशी त्यांची भेट झालीही नाही, नजरानजर होण्याचा तर प्रश्नच नाही. तरीही ही एक प्रेमकथाच. इंटरनेच्या महाजालावर खुललेली. या कथेला पार्श्वभूमी सायबर विश्वाची आणि त्यात रंग भरलेत वास्तव जगातील पात्रांनी. सिंड्रेलाच्या बुटावरून राजकुमाराने तिचा शोध घेतला होता. इथे सिंड्रेलाच्या शोधाला आधार दिला इंटरनेटने!
पॅट्रिक मोबर्ग हा ब्रुकलिना रहिवासी. व्यवसायाने वेब डिझाइनर. मॅनहट्टनला जाताना एक दिवस त्याच्या नजरेस ती पडली. त्या वेळी ती स्वतःच्या डायरीत काहीतरी लिहीत होती. ती रविवारची रात्र होती. गाडीत खूप गर्दी होती. त्यामुळे दोघेही एकाच स्थानकावर उतरले तरी तिचे नाव विचारण्याची संधीही त्याला मिळाली नाही.
बहुतेक प्रेमप्रकरणांप्रमाणेच हे प्रकरणही इथेच थांबायला हरकत नव्हती. मात्र, पॅट्रिकचा व्यवसाय त्याच्या मदतीला आला. त्याने त्या मुलीचे चित्र त्याला ती जशी दिसली तसे काढले. हे चित्र अपलोड करून एक नवी वेबसाइटच सुरू केली. www.nygirlofmydreams.com हे त्या वेबसाइटचे नाव. वेबसाइटवर त्याने आपला मोबाइल नंबर आणि ई-मेल ऍड्रेसही ठेवला. शिवाय त्या मुलीबाबत माहिती असल्यास संपर्क साधण्याचेही आवाहन केले.
काही तासांच्या आत पॅट्रिकच्या इनबॉक्समध्ये “मेल’चा ढीग साचू लागला. अनेकांनी त्याला त्या मुलीबाबत माहिती असण्याचा दावा केला. पॅट्रिकच्या मोबाइलची रिंगही सातत्याने खणखणत होती. या सर्व घडामोडींची माहिती पॅट्रिक आपल्या वेबसाइटवर देत होता. अखेर दोन दिवसांनंतर एका महिलेने पॅट्रिकच्या वर्णनाशी मिळतीजुळती मुलगी पाहिल्याचा दावा केला. तिने त्या मुलीचे छायाचित्रही पाठविले. त्याने खात्री पटविल्यानंतर तिने या दोघांचा संपर्कही घडवून आणला.
या मुलीचे नाव कॅमिल हेटन असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सिंड्रेलाच्या बुटाप्रमाणे शोधमोहिमेचा विषय झालेली 22 वर्षांची कॅमिल “ब्लॅकबुक’ या नियतकालिकात शिकाऊ पत्रकार आहे. या सर्व घडामोडींची माहिती मिळाल्यावर तिला स्वतःलाही आश्चर्य वाटले. इथे पॅट्रिकची सायबर प्रेमकथा संपते.
आता सिंड्रेलाचा शोध लागला असल्यामुळे, आपल्या प्रेमकथेविषयी काहीही सांगणार नसल्याचा फलकच पॅट्रिकने त्याच्या वेबसाइटवर लावला आहे. येथून पुढे तुम्हीच इच्छेप्रमाणे या कथेचा शेवट करा, असेही त्याने वेबसाइटवर म्हटले आहे. हे आहे एकविसाव्या शतकातील प्रेमकथेचे स्वरूप!
