Devdesh’s Weblog

दिसामाजी काहीतरी लिहावे

Archive for डिसेंबर 2007

चालता-बोलता संगीत

without comments

बससाठी वाट पाहताना पं. रवीशंकर यांची सतार ऐकता येत असल्यास? हॉटेलमध्ये दिलेली ऑर्डर सर्व्ह होण्याच्या वेळेत मायकल जॅक्‍सनचे गाणे ऐकण्याची कल्पना कशी वाटते? कोणासाठी वाट पाहण्यास थांबलो असताना एखादे जुने रोमॅंटिक गाणे ऐकण्याची सोय असल्यास?

पीएमपीवरील लेखएकेकाळी कल्पना असलेल्या या गोष्टी आता प्रत्यक्षात उतरल्या आहेत. पूर्वी वॉकमनने हेच काम केले होते. मात्र तुटपुंजी बॅटरी लाइफ आणि यंत्रणेतील बिघाडामुळे त्या सोयीवर किती मर्यादा येत होत्या, हे वॉकमन वापरणारेच जाणो! नव्या “पीएमपी’मध्ये कॅसेट, बॅटरी सेल यांची कटकट तर नाहीच, शिवाय आवाजाचा दर्जा आणि सुटसुटीतपणा हे त्यांचे खास वैशिष्ट्य.

“ऍपल’ कंपनीने सहा वर्षांपूर्वी “ऑयपॉड’ हा “पीएमपी’ बाजारात आणला. तेव्हापासून सर्वच “पीएमपी’ला “आयपॉड’ म्हटले जाते. पहिल्या “आयपॉड’मध्ये केवळ गाणे ऐकण्याची सोय होती. नंतरच्या मॉडेल्समध्ये मात्र व्हिडिओचीही सोय करण्यात आली. “आयपॉड’ पाठोपाठ सोनी, फिलिप्स आणि “सॅमसंग’नेही “पीएमपी’ची मॉडेल बाजारात आणली. चिनी बनावटीची काही “पीएमपी’ही उपलब्ध आहेत. त्यांतील काही मॉडेलमध्ये डिजिटल कॅमेऱ्याचाही समावेश असला, तरी त्यांची बॅटरी लाइफ शंकास्पदच असते. बॅटरी रिजार्चेबल असली तरी प्रवास वगैरे काळात ती अधिक काळ चालणे महत्त्वाचे, नाही का?

अनेक भारतीय कंपन्यांनीही “पीएमपी’ची मॉडेल्स बाजारात आणली आहेत. त्यांच्या दर्जाबाबत मात्र खात्री देता येत नाही. त्यांच्या किमती कमी आहेत एवढेच! (कुठे, कोण्या दुकानदाराकडे घेतले आणि घेताना किती घासाघीस केली, यावर त्या अवलंबून आहेत!) आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे “पीएमपी’ किमान साडेतीन हजारांपासून उपलब्ध आहेत. व्हिडिओची सोय आणि “मेमरी’ यांवर त्या किमती अवलंबून आहेत. “आयपॉड’ची किंमत अर्थातच खूप अधिक आहे. मात्र “आयपॉड’वर गाणे (किंवा अन्य कार्यक्रम) ऐकण्यासाठी खास “आयट्यून्स.कॉम’ ही साईट आहे. अन्य “पीएमपी’वर कॉम्प्युटरवरून कार्यक्रम लोड करावे लागतात. गाणेच नाही तर एमपी3, एमपी4, डब्लूएमए आणि डब्लूएमव्ही या प्रकारातील कोणतीही फाइल पीएमपीवर चालू शकते. त्यामुळे “पॉडकास्ट’, “व्होडकास्ट’ डाऊनलोड करून “पीएमपी’वर ऐकण्याचा मार्ग बहुतेक जण पसंत करतात. मला स्वतःला पीएमपीची ही सोय खूप महत्त्वाची वाटते. अनेक आंतरराष्ट्रीय रेडियो केंद्रांचे कार्यक्रम ज्याप्रमाणे पीएमपीवर पॉडकास्टचे कर्यक्रम डाऊनलोड करून ऐकता येतात, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे संगीतही ऐकणे त्यामुळे सुलभ झाले आहे.

बहुतांश पीएमपीचा उपयोग “यूएसबी स्टोरेज’साठी होत असल्याने डाटा ट्रान्सफर अधिक सोपे झाले आहे. त्यासाठी “मेमरी’च्या मर्यादा आहेतच, मात्र त्यावरही “कार्ड स्लॉट’चा उपाय आहे. एकूणच संगीताच्या छंदासाठी साधारणतः दोन-अडीच हजार रुपये खर्चण्यास जे तयार आहेत, त्यांच्यासाठी “पीएमपी’ ही एक सोयच झाली आहे.

———-

पीएमपी लेखाची पीडीएफ फाईल

Written by देविदास देशपांडे

डिसेंबर 22, 2007 at 11:06 सकाळी

चतुरंगी चित्रपटाची चित्तरकथा!

without comments

डॉन ते बिल्लाएकच चित्रपट…एकच कथा…त्याच्याही चार आवृत्या. त्यातील दोन आवृत्यांनी चित्रपटाच्या नायकाला नव्या उंचीवर नेले तर दोन चित्रपटांनी मूळ नायकाच्या सृती जागवण्यापलीकडे काहीही साध्य केले नाही. “डॉन’ या चित्रपटाची “चित्तरकथा’ ही अशी दोन ओळींत सांगता येईल. अमिताभ बच्चनच्या संस्मरणीय भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या “डॉन’ची शाहरूख खानने नक्कल केली तेव्हा सर्वांनी चर्चा केली. खाली दक्षिण भारतातही अशीच चर्चा चालू आहे ती “डॉन’च्या तमिळ आवृत्तीबाबत म्हणजेच “बिल्ला’ या चित्रपटाची.

सुमारे 27 वर्षांपूर्वी आलेल्या “डॉन’ या चित्रपटाने अमिताभ बच्चनची बॉलिवूडमध्ये (तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीला हे नाव मिळालेले नव्हते) प्रतिष्ठा उंचावली होती. यशस्वी नायक म्हणून अमिताभ प्रस्थापित झाला असला तरी “डॉन’मुळे त्याच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब झाले. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला हे तर सर्वांनाच माहित आहे. त्यानंतर दक्षिण भारताच्या परंपरेप्रमाणे या चित्रपटाचे “रिमेक’ झाले. त्यातील तमिळ भाषेतील “बिल्ला’ या “रिमेक’ने तिकिट खिडकीवर प्रचंड धंदा केला. त्यावेळी तमिळमधील उगवता नायक असलेल्या रजनीकांतने या चित्रपटात नायकाची भूमिका केली होती. “बिल्ला’च्या यशाचा रजनीकांतला अपेक्षेबाहेर फायदा झाला. तो चित्रपट रजनीकांतच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड मानण्यात येतो. याच चित्रपटाने त्याला सुपरस्टारपद बहाल केले. दक्षिण भारतात तो दक्षिणेचा अमिताभ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याची ती ओळख आजपर्यंत कायम राहिली आहे.

बॉलिवूडचा नवा “किंग’ म्हणून दावा करणाऱ्या शाहरूख खान आणि फरहान अख्तर यांनी गेल्या वर्षी “डॉन’चा रिमेक काढला. त्यावेळी त्यांनी प्रसिद्धीसाठी आणि चित्रपटाच्या यशासाठीही मूळ “डॉन’च्या लोकप्रियतेचा बऱ्यापैकी उपयोग करून घेतला. (तसा तो कोण करून घेत नाही. “सेट मॅक्‍स’ वाहिनीसुद्धा महिन्यातून दोन-दोनदा त्यासाठीच “डॉन’चे प्रदर्शन करत नसते का?) त्यावेळी काही माध्यमांतून “बिल्ला’बद्दलही चर्चा केली होती. “डॉन’मध्ये “ये मेरा दिल’ गाणे चित्रित झालेल्या हेलननेच “बिल्ला’तील गाण्यातही काम केले होते. शाहरूखच्या “डॉन’पेक्षा रजनीकांतने “बिल्ला’मध्ये अधिक चांगले काम केले होते, या तिच्या मतावरही काही ठिकाणी चर्चा झाली. नव्या चित्रपटाची लोकांनी तारीफ केली तरी अमिताभची सर शाहरूखला नाही यावर त्यांचे एकमत झाले.

एवढे सगळे झाल्यावर “बिल्ला’चा रिमेक झाला नसता तरच नवल. (म्हणजे “डॉन’चा चौथा अवतार!) त्याप्रमाणे नव्या पिढीतील लोकप्रिय अभिनेता अजित याची मुख्य भूमिका असलेला “बिल्ला’ गेल्या आठवड्यात तमिळनाडूत रुजू झाला. याही चित्रपटाला सुरवातीला मोठा प्रतिसाद मिळाला. “शिवाजी’च्या यशाशी त्याची बरोबरी करण्यात येऊ लागली. मात्र याही चित्रपटात प्रेक्षकांनी मूळ “बिल्ला’च्या रजनीकांतची सर अजितला नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे याही अर्थाने रजनीकांत “दक्षिणेतला अमिताभ’ ठरला आहे!

Written by देविदास देशपांडे

डिसेंबर 19, 2007 at 4:39 pm

“सर्च’ न झालेलं लग्न!

without comments

सध्याच्या जगात कोणतीही गोष्ट शोधायची असेल तर “गुगल’चा आधार घ्यावा, असं अनेक जण बेलाशक सांगतात. मात्र त्याच “गुगल’च्या मालकाने लग्न केले, तेव्हा त्याची गंधवार्ताही कोणाला लागू नये, याची काळजी या मालकाने घेतली. “गुगल’च्या दोन मालकांपैकी एक असलेला लॅरी पेज व ल्युसी साऊथवर्थ यांनी गेल्या शनिवारी “नेकर आयलॅंड’ येथे सहजीवनाची शपथ घेतली तेव्हा अत्यंत मोजकी मंडळी उपस्थित होती. निमंत्रितांनाही लग्नस्थळी खास बोटीने किंवा हेलिकॉप्टरने जावे लागले. इतरांना तर केवळ दूर राहूनच अंदाज बांधावे लागले.

लॅरी पेज हा 34 वर्षे वयाचा आणि केवळ 18. 5 अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे 835.2 कोटी रुपये) खासगी संपत्ती असलेला “एलिजिबल बॅचलर.’ सात वर्षांपूर्वी आपला वर्गमित्र सर्गेई ब्रिन याच्यासोबत त्याने 1998 “गुगल’चा पाया घातला. आता त्याचा कळस कुठपर्यंत गेला आहे, हे पाहणेही अवघडच नाही तर अशक्‍य झाले आहे. अशा या वराच्या गळ्यात माळ घालणारी मुलगी कोण असेल, याची उत्सुकता सगळ्या जगालाच (रिअल आणि वर्च्युअल दोन्ही) होती. ते औत्सुक्‍य शमवितानाच वैयक्तिक बाबी गोपनीय ठेवण्याची दक्षताही त्याने घेतली आहे.

ल्युसी ही लॅरीप्रमाणेच स्टॅनफोर्ड विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. “वेब’ तंत्रज्ञानाचा अनभिषिक्त सम्राट बनलेल्या लॅरीच्या पसंतीची मुलगी मात्र वैद्यकीय शाखेशी संबंधित आहे. “बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक्‍स’ शाखेत ती संशोधन करते. पेनसिल्वानिया विद्यापीठ आणि ऑक्‍सफोर्ड विद्यापीठाची ती पदवीधारक आहे. दक्षिण आफ्रिकेत काही काळ तिने वैद्यकीय सेवा केली. लॅरीला न जमलेली एक गोष्ट साध्य करून तिने संसार सुरू करण्याआधीच एक पाऊल पुढे टाकले आहे. डॉक्‍टरेट मिळविण्यासाठी गेल्याच महिन्यात तिची तोंडी परीक्षा झाली. त्यामुळे पीएच.डी. मिळण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला आहे. याऊलट लॅरी आणि सर्गेई पीएच.डी.साठी संशोधन करत असतानाच “गुगल’ स्थापन करण्यासाठी त्यांनी विद्यापीठातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला होता.

ज्या गुप्ततेने या दोघांनी लग्न केले, तीच गोपनीयता त्यांनी लग्नानंतरही कायम ठेवली आहे. मात्र तसे असले तरी दोघांचा संसार सुरळीत चालू असेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

लॅरी आणि त्याची पत्नी

Written by देविदास देशपांडे

डिसेंबर 12, 2007 at 5:05 pm