Devdesh’s Weblog

दिसामाजी काहीतरी लिहावे

Archive for नोव्हेंबर 2008

ते आणि आपण

with 3 comments

मुंबईत झालेल्या स्फोटांचे आणि हल्ल्यांचे प्रकरण अद्याप संपलेले नाही. या घटनेच्या वार्तांकनासाठी गेली दोन दिवस अनेक वाहिन्या आणि वर्तमानपत्रांचे वार्ताहर शब्दशः जीवाच्या कराराने घटनास्थळी थांबलेले आहेत. त्यांच्यापैकी काही जण केवळ नशिबाने वाचले तर काही जखमी झाले आहेत. त्यांचे खरोखर कौतुकच केले पाहिजे.

या घटनेचे वार्तांकन अपेक्षेप्रमाणे जगभरच्या माध्यमांनी केले. मात्र या वार्तांकनात महत्त्वाचा फरक दिसून येतो. पाश्चात्य माध्यमांनी या घटनेची छायाचित्रे प्रकाशित करताना कुठेही मृतदेह, खंडीत झालेले देह, भयभीत चेहरे येू दिलेले नाहीत. हल्ल्यांची तीव्रता वाचकांपर्यंत नेण्यासाठी निर्जीव वस्तूंचाही वापर करता येऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. आपल्याकडे मात्र रडके चेहरे, मृतदेह, जखमी व्यक्ती किंवा मृतांच्या नातेवाईकांची शोकमग्न छायाचित्रे यांची रेलचेल आहे. मृत व्यक्तीचाही मान कायम ठेवला पाहिजे, हे आपण कधी शिकणार?

Written by देविदास देशपांडे

नोव्हेंबर 28, 2008 at 1:49 pm

Posted in Uncategorized

माध्यमांचा काळ सुखाचा

without comments

र्तमानपत्रांना मरण नाही, असे सांगणाऱया रुपर्ट मर्डोक यांचा स्टार उद्योग समूह मुद्रीत माध्यमांमध्ये प्रवेश करणार असल्याची पक्की खबर आहे. बिझिनेस स्टँडर्ड या वर्तमानपत्रातील एका बातमीनुसार, स्टारच्या हाँग काँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल ऐयलो, स्टार इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय शंकर आणि मुख्य परिचालन अधिकारी जगदीश कुमार बेंगळूरु येथे आपल्या भावी भागीदारांचा शोध घेण्यासाठी गेले होते.

मर्डोक किंवा त्यांच्या समूहाने असा निर्णय घेतलाच असेल, तर तो फारसा आश्चर्यजनक नाही. भारतात तरी मुद्रीत माध्यम हे सनराईज क्षेत्र आहे. भारतात माध्यम उद्योग गेल्या काही वर्षात जवळपास भूमितीय श्रेणीने वाढत आहे. प्राईसवॉटरहाऊसकूपर आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया यांनी गेल्या वर्षी केलेल्या पाहणीत, मुद्रीत माध्यमांची उलाढाल १४९ अब्ज रुपये असल्याचे तसेच २०१२ पर्यंत हा आकडा २८१ अब्ज रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याच अहवालात असेही म्हटले आहे, की २००७ या वर्षात माध्यम उद्योगाची त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढ झाली तर पाच वर्षांसाठी हाच आकडा १९ टक्के एवढा आहे.

भारतीय संस्थाच नव्हे, तर भारतीय माध्यम क्षेत्राच्या उज्ज्वल भवितव्याची ग्वाही जागतिक संस्थांनीही दिली आहे. वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स या संस्थेच्या २००७ सालच्या अहवालानुसार, भारतीय माध्यम उद्योगाची दरवर्षी ११ टक्क्यांनी वाढ होत आहे.  जगात वर्तमानपत्रांच्या सर्वाधिक मोठ्या पाच बाजारपेठांमध्ये चीनच्या (१० कोटी ७० लाख प्रती दररोज) मागोमाग भारताचा क्रमांक (९ कोटी ९० लाख प्रती दररोज) आहे. तिसऱया क्रमांकावर असलेल्या जपानमध्ये खपाचा आकडा ६ कोटी ८० लाख प्रती दररोज आहे, चौथ्या स्थानावरील अमेरिकेत दररोज ५ कोटी १० लाख आहे हे लक्षात घेतले म्हणजे या बाजारपेठांतील तफावत लक्षात येईल.

याच अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वर्तमानपत्रांच्या खपात २००७ या वर्षी ११.२ टक्क्यांनी वाढ झाली. पाच वर्षांच्या काळात हीच वाढ ३५.५१ वाढ झाली. जगातील सर्वाधिक खपाच्या १०० वर्तमानपत्रांपैकी ७४ वर्तमानपत्रे आशियात आहेत. त्यातील ६२ वर्तमानपत्रे चीन, जपान आणि भारतात आहेत.

सध्या मंदीचा काळ असला तरी वृत्तमाध्यमांसाठी मंदीचा काळ हाच सुगीचा काळ असतो. त्यामुळे भारतीय माध्यमांसाठी तरी आता काळ सुखाचा आहे, हे खरे.

Written by देविदास देशपांडे

नोव्हेंबर 25, 2008 at 2:59 pm

वर्तमानपत्रे चिरायु होवो

with 2 comments

rupert-murdoch

मुद्रीत प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱयांसाठी खुशखबर.  नव्या माध्यमांच्या आक्रमणामुळे भयभीत झालेल्या पत्रकारांच्या उज्ज्वल भवितव्याची ग्वाही खुद्द माध्यमसम्राट रुपर्ट मर्डोक यांनीच दिली आहे. वेब पत्रकारितेचे आव्हान मुद्रीत माध्यमे पेलू शकतील आणि मुद्रीत माध्यमांची मरणाची शक्यता वर्तविणारे खोटे पडतील, असे मर्डोक यांनी म्हटले आहे. 

न्यूज कॉर्पोरेशन या जगड्व्याळ माध्यम शृंखलेचे मालक असलेले आणि सन, टाईम्स (ब्रिटन) व वॉल स्ट्रीट जर्नल यांसारखी वृत्तपत्रे खिशात बाळगणारे मर्डोक यांनी नुकतेच ऑस्ट्रेलियन व्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनसाठी रेडियोवर एक भाषण दिले. त्यात मर्डोक म्हणतातः आमच्या पत्रकार बांधवांमध्ये काही निराशावादी लोकं आहेत. ते त्यांच्यापुढे आलेल्या संधींमुळे उत्साहित होण्याऐवजी स्वतःचेच मृत्युलेख लिहिण्यात मग्न आहेत.  असे निराशावादी लोक काहीही म्हणत असले तरी एकविसाव्या शतकात वर्तमानपत्रे नवी उंची गाठतील, असा मला विश्वास वाटतो. 

असे असले तरी, वर्तमानपत्रांना संकेतस्थळे आणि इ-मेलसारख्या माध्यमांचा उपयोग करून वैयक्तिक पसंतीप्रमाणे बातम्या आणि जाहिराती पुरवाव्या लागतील. वर्तमानपत्रांना व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा वाचकांना माहिती द्यावी लागेल, असंही मर्डोक म्हणतात.

मर्डोक यांचे आणखी एक निरीक्षण आहे, ते काहीसे खरे असल्याचे वैयक्तिक अनुभवावरून मी सांगू शकतो. वर्तमानपत्रांच्या संपादकीय विभागात काहीशी मरगळ आणि तुसडेपणाचे वातावरण आहे.  एकेकाळी माहिती पुरविण्यावर एकाधिकार गाजविल्यानंतर नव्या माध्यमांशी स्पर्धा करताना आलेल्या हतबलतेतून ही वृत्ती आहे, असे ते म्हणतात. ते बहुतांशी खरे आहे. पूर्वी काही संपादक ठरवून बातम्यांचे अस्तित्व ठरवित असत. आता संपादक आपली शक्ती हरवून बसले आहेत, असंही ते म्हणतात.

मर्डोक यांची मूळ मुलाखत इथे आहे.

Written by देविदास देशपांडे

नोव्हेंबर 18, 2008 at 1:06 pm