वर्तमानपत्रे चिरायु होवो

मुद्रीत प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱयांसाठी खुशखबर. नव्या माध्यमांच्या आक्रमणामुळे भयभीत झालेल्या पत्रकारांच्या उज्ज्वल भवितव्याची ग्वाही खुद्द माध्यमसम्राट रुपर्ट मर्डोक यांनीच दिली आहे. वेब पत्रकारितेचे आव्हान मुद्रीत माध्यमे पेलू शकतील आणि मुद्रीत माध्यमांची मरणाची शक्यता वर्तविणारे खोटे पडतील, असे मर्डोक यांनी म्हटले आहे.
न्यूज कॉर्पोरेशन या जगड्व्याळ माध्यम शृंखलेचे मालक असलेले आणि सन, टाईम्स (ब्रिटन) व वॉल स्ट्रीट जर्नल यांसारखी वृत्तपत्रे खिशात बाळगणारे मर्डोक यांनी नुकतेच ऑस्ट्रेलियन व्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनसाठी रेडियोवर एक भाषण दिले. त्यात मर्डोक म्हणतातः आमच्या पत्रकार बांधवांमध्ये काही निराशावादी लोकं आहेत. ते त्यांच्यापुढे आलेल्या संधींमुळे उत्साहित होण्याऐवजी स्वतःचेच मृत्युलेख लिहिण्यात मग्न आहेत. असे निराशावादी लोक काहीही म्हणत असले तरी एकविसाव्या शतकात वर्तमानपत्रे नवी उंची गाठतील, असा मला विश्वास वाटतो.
असे असले तरी, वर्तमानपत्रांना संकेतस्थळे आणि इ-मेलसारख्या माध्यमांचा उपयोग करून वैयक्तिक पसंतीप्रमाणे बातम्या आणि जाहिराती पुरवाव्या लागतील. वर्तमानपत्रांना व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा वाचकांना माहिती द्यावी लागेल, असंही मर्डोक म्हणतात.
मर्डोक यांचे आणखी एक निरीक्षण आहे, ते काहीसे खरे असल्याचे वैयक्तिक अनुभवावरून मी सांगू शकतो. वर्तमानपत्रांच्या संपादकीय विभागात काहीशी मरगळ आणि तुसडेपणाचे वातावरण आहे. एकेकाळी माहिती पुरविण्यावर एकाधिकार गाजविल्यानंतर नव्या माध्यमांशी स्पर्धा करताना आलेल्या हतबलतेतून ही वृत्ती आहे, असे ते म्हणतात. ते बहुतांशी खरे आहे. पूर्वी काही संपादक ठरवून बातम्यांचे अस्तित्व ठरवित असत. आता संपादक आपली शक्ती हरवून बसले आहेत, असंही ते म्हणतात.
मित्रा, तुझा blog वाचला आणि मर्डोक यांचा लेखही.
तू म्हणतो ते बरोबर आहे, पण त्याबरोबर मर्डोक यांची भाषाही जर-तरची आहे. वृत्तपत्रांना मरण नाही, हे नक्की पण जगण्यासाठी त्यांना इतर माध्यमांची गरज भासणार हे ही नक्कीच.
वेबसाईटसारखे माध्यम पुढील काळात आणखी प्रभावी बनणार हे कोणीही नाकारू शकत नाही आणि या माध्यमाची मदत घेतील तीच वृत्तपत्रे टिकतील, हे स्पष्ट आहे.
विश्वनाथ
wishwanath
नोव्हेंबर 21, 2008 at 5:55 सकाळी
खरं आहे विश्वनाथ. मात्र वर्तमानपत्रांना भवितव्य नसल्याचाच जो आभास सध्या उभा केला जात आहे, त्यासंदर्भात मर्डोक यांचे विधान महत्वाचे आहे, असे माझे मत आहे.
राहता राहिला वेबसाईटचा प्रश्न, माध्यमक्रांतीच्या पुढील पावलापर्यंत तरी त्यांना मरण नाही.
देविदास देशपांडे
नोव्हेंबर 22, 2008 at 6:41 सकाळी