रजनीकांत अभिनीत आणि शंकर दिग्दर्शित एन्दिरन या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा तीनदा झाला. पहिला तमिळ गाण्यांचा मलेशियात, तेलुगू आवृत्तीसाठीचा हैदराबादला आणि हिंदी आवृत्तीसाठी मुंबईत. त्यातील मलेशियातील सोहळा पाहताना जाणवत होतं, की या कार्यक्रमासाठी कमीत कमी दोन ते तीन कोटी रुपये खर्च झाले असतील. त्याच प्रमाणात चित्रपटाची चर्चाही झाली, प्रसिद्धीही झाली आणि धंदाही झाला.
मराठीतील आघाडीचे तीन नायक पहिल्यांदा एकत्र येत असलेला आयडीयाची कल्पना हा चित्रपट येत्या ३१ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. त्याचा संगीत अनावरण सोहळा रविवारी पुण्यात क्रॉसवर्डमध्ये झाला. तीनही नायक – त्यातील एक चित्रपटाचा दिग्दर्शक आणि सह-संगीतकार – कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. ज्याप्रमाणे एन्दिरन हा तमिळ चित्रसृष्टीसाठी एक मोठा टप्पा होता, त्याचपातळीवर नव्हे पण मराठी चित्रपटांच्या दृष्टीने ही निश्चितच मोठी घटना होती. मराठी चित्रपटांना ज्यावेळी मान टाकली होती, त्यावेळी सचिन आणि महेशनी त्यांना तगविण्यात निःसंशय मोठी भुमिका निभावली. पण क्रॉसवर्डमध्ये त्यावेळी जमलेल्या १००-१५० लोकांव्यतिरिक्त कोणाच्या गावीही नव्हतं, की इथे असा काही कार्यक्रम चालू आहे.
या दोन कार्यक्रमांची तुलना केली, की दाक्षिणात्य आणि मराठी चित्रसंस्कृतीतील फरक ठळकपणे जाणवला. खुद्द सचिन, अशोक सराफ आणि महेश कोठारे या आपलं नाणं तिकीट बारीवर कित्येकदा खणखणीत वाजवलेल्या नायकांनाही हा फरक मान्य असल्याचं त्यांना बोलताना जाणवलं. मात्र त्याचा दोष त्यांनी प्रेक्षकांना दिला.
"दक्षिणेत चित्रपटांना डेडिकेटेड प्रेक्षकवर्ग आहे. ते लोक एकवेळ उपाशी राहतील पण चित्रपट पाहतील. तसा त्यांचा उद्योगही त्याप्रमाणात मोठा आहे. चित्रपट खपविण्यासाठी ते म्हणूनच मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करू शकतात. आपल्याकडे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे किंवा मल्टिप्लेक्सकडे इतक्या सहजपणे जात नाही. त्यामुळे मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांची तुलना होऊ शकत नाही," असं सचिन यांचं म्हणणं होतं. मात्र त्याच वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्याची ताकद असलेले चित्रपट कमी निर्माण होत आहेत, हेही त्यांना मान्य आहे. "चित्रपट चांगला असेल, तर लोक आपोआप येतात. मात्र आपणच चांगले चित्रपट बनवायचे नाहीत आणि नंतर लोक येत नाहीत म्हणून ओरड करायची, याला काही अर्थ नाही," असं ते म्हणाले.
प्रेक्षकांबाबतची ही तक्रार अशोक सराफ यांचीही आहे. "सरकारने विविघ योजना सुरू केल्या. जे काही करायचे ते केले. तरीही मराठी चित्रपटांची स्थिती सुधारली आहे, असं दिसत नाही. याचं कारण प्रेक्षकच मुळात चित्रपटांना येत नाहीत," असं सराफ यांचं म्हणणं. मराठी चित्रपटांना अलिकडे चांगले दिवस आल्याची चर्चा आहे. तेही सराफ यांना मान्य नाही.
"मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत, असं म्हटलं जातं. कारण चित्रपट निर्मितीचे प्रमाण वाढलंय. ढिगाने चित्रपट येतायत. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सुधारलेत, कलाकारांना काम मिळतंय…अशा सर्व गोष्टी खऱ्या आहेत. पण मुळात चित्रपट पाहायला लोक आहेत का, हा खरा मुद्दा आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले म्हणणं फारसं खरं नाही," हा त्यांचा मुद्दा.
गंमत म्हणजे सचिन, महेश कोठारे आणि अशोक सराफ या तिघांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख तयार केलेली होती. मात्र हिंदीपेक्षा मराठीतच काम करणं तिघांनीही पसंत केलं आहे. कारण हिंदीत काम केल्याने समाधान मिळत नसल्याचं तिघांचंही म्हणणं पडलं होतं. त्यातील सराफ यांनी हिंदीतील काम पूर्णपणे थांबविलं आहे. कोठारे मात्र त्यांच्या मुलाला हिरो म्हणून सादर करण्यासाठी जानेवारीत हिंदी चित्रपट काढणार आहेत.
"हिंदीत आमच्या मनाजोगतं काम मिळत नाही. शिवाय मराठीत काम करणं आम्हाला अधिक सोयीचं वाटतं. We feel at home while working in Marathi," असं सचिनचं म्हणणं, तर हा बांधिलकीचा प्रश्न असल्याचं कोठारे यांचं म्हणणं. मात्र अशोक सराफ यांचं मत काहीसं वेगळं पडलं. "हिंदीत मला त्याच त्याच भूमिका मिळत होत्या. आपल्या मराठीतील विनोद आणि हिंदीतील विनोदाची तुलना केली, तर त्यातल्या दर्जातील फरक तुम्हाला कळून येईल. मनाला समाधान न देणारी अशी कामे करायची नाहीत, हे मी ठरविलं," असं त्यांनी सांगितलं.
[...] This post was mentioned on Twitter by memarathi, देविदास देशपांडे . देविदास देशपांडे said: दोन चित्रपट दोन संस्कृती: http://wp.me/p9q2Y-1n [...]