ये बच्चों के खेलने की चीज नहीं
व्हिडिओ गेम ही एके काळी लहानांची मक्तेदारी होती. एके काळी म्हणण्याचे कारण असे, की आता कॉम्प्युटरमुळे विविध प्रकारचे खेळ खेळण्याचे वेड लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांमध्ये सारख्याच प्रमाणात दिसून येते. या ट्रेंडचा फायदा व्हिडिओ गेमच्या निर्मात्यांनी घेतला नसता तरच नवल. त्यातूनच “व्हिडिओ गेम कन्सोल’ ही नवी संकल्पना उदयास आली.
जी यंत्रे “व्हिडिओ गेम’साठी स्वतः वापरण्याबरोबरच पैसे घेऊन इतरांनाही खेळण्यास देता येतात, त्यांना “आर्केड गेम’ असे म्हणतात. आपल्याकडे बहुतांश व्हिडिओ गेम पार्लरमध्ये या प्रकारची यंत्रे आहेत. जी यंत्रे केवळ स्वतःसाठी वापरता येतात त्यांना कन्सोल म्हणतात. हा प्रकार अद्याप रुळायचा आहे. तरीही हा प्रकार झपाट्याने लोकप्रिय होत आहे, एवढं खरं.
“व्हिडिओ गेम कन्सोल’च्या क्षेत्रात अद्याप तरी सोनी आणि मायक्रोसॉफ्ट ही दादा मंडळी आहेत. “सोनी’च्या “प्ले स्टेशन3′ (पीएस3) आणि मायक्रोसॉफ्टच्या “एक्स बॉक्स 360′ या दोन्ही कन्सोलमध्येच सध्या प्रामुख्याने स्पर्धा आहे. “निन्टेंडो’ ही कंपनीही या क्षेत्रात आहे, मात्र भारताततरी या कंपनीची उत्पादने नाहीत. “पीएस3′ हे मूळात पहिल्या कन्सोलची तिसरी आवृत्ती आहे. आपल्याकडे “पीएस1′ ही उपलब्ध असून, त्याची किंमत सुमारे चार हजार रुपयांपासून पुढे आहे. “पीएस3′ आणि “एक्सबॉक्स360′च्या किमती मात्र दहा ते वीस हजारांपासून पुढे आहेत. खास मोठ्या व्यक्तींसाठी केलेली निर्मिती ही या कन्सोलची वैशिष्ट्ये आहेत. त्यात गेमही त्या दृष्टीनेच विकसित केलेले आहेत. त्यामुळे म्हणावे लागेल, व्हिडिओ गेम ही आता केवळ लहानांनी खेळण्याची गोष्ट राहिली नाही.
चालता-बोलता संगीत
बससाठी वाट पाहताना पं. रवीशंकर यांची सतार ऐकता येत असल्यास? हॉटेलमध्ये दिलेली ऑर्डर सर्व्ह होण्याच्या वेळेत मायकल जॅक्सनचे गाणे ऐकण्याची कल्पना कशी वाटते? कोणासाठी वाट पाहण्यास थांबलो असताना एखादे जुने रोमॅंटिक गाणे ऐकण्याची सोय असल्यास?
एकेकाळी कल्पना असलेल्या या गोष्टी आता प्रत्यक्षात उतरल्या आहेत. पूर्वी वॉकमनने हेच काम केले होते. मात्र तुटपुंजी बॅटरी लाइफ आणि यंत्रणेतील बिघाडामुळे त्या सोयीवर किती मर्यादा येत होत्या, हे वॉकमन वापरणारेच जाणो! नव्या “पीएमपी’मध्ये कॅसेट, बॅटरी सेल यांची कटकट तर नाहीच, शिवाय आवाजाचा दर्जा आणि सुटसुटीतपणा हे त्यांचे खास वैशिष्ट्य.
“ऍपल’ कंपनीने सहा वर्षांपूर्वी “ऑयपॉड’ हा “पीएमपी’ बाजारात आणला. तेव्हापासून सर्वच “पीएमपी’ला “आयपॉड’ म्हटले जाते. पहिल्या “आयपॉड’मध्ये केवळ गाणे ऐकण्याची सोय होती. नंतरच्या मॉडेल्समध्ये मात्र व्हिडिओचीही सोय करण्यात आली. “आयपॉड’ पाठोपाठ सोनी, फिलिप्स आणि “सॅमसंग’नेही “पीएमपी’ची मॉडेल बाजारात आणली. चिनी बनावटीची काही “पीएमपी’ही उपलब्ध आहेत. त्यांतील काही मॉडेलमध्ये डिजिटल कॅमेऱ्याचाही समावेश असला, तरी त्यांची बॅटरी लाइफ शंकास्पदच असते. बॅटरी रिजार्चेबल असली तरी प्रवास वगैरे काळात ती अधिक काळ चालणे महत्त्वाचे, नाही का?
अनेक भारतीय कंपन्यांनीही “पीएमपी’ची मॉडेल्स बाजारात आणली आहेत. त्यांच्या दर्जाबाबत मात्र खात्री देता येत नाही. त्यांच्या किमती कमी आहेत एवढेच! (कुठे, कोण्या दुकानदाराकडे घेतले आणि घेताना किती घासाघीस केली, यावर त्या अवलंबून आहेत!) आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे “पीएमपी’ किमान साडेतीन हजारांपासून उपलब्ध आहेत. व्हिडिओची सोय आणि “मेमरी’ यांवर त्या किमती अवलंबून आहेत. “आयपॉड’ची किंमत अर्थातच खूप अधिक आहे. मात्र “आयपॉड’वर गाणे (किंवा अन्य कार्यक्रम) ऐकण्यासाठी खास “आयट्यून्स.कॉम’ ही साईट आहे. अन्य “पीएमपी’वर कॉम्प्युटरवरून कार्यक्रम लोड करावे लागतात. गाणेच नाही तर एमपी3, एमपी4, डब्लूएमए आणि डब्लूएमव्ही या प्रकारातील कोणतीही फाइल पीएमपीवर चालू शकते. त्यामुळे “पॉडकास्ट’, “व्होडकास्ट’ डाऊनलोड करून “पीएमपी’वर ऐकण्याचा मार्ग बहुतेक जण पसंत करतात. मला स्वतःला पीएमपीची ही सोय खूप महत्त्वाची वाटते. अनेक आंतरराष्ट्रीय रेडियो केंद्रांचे कार्यक्रम ज्याप्रमाणे पीएमपीवर पॉडकास्टचे कर्यक्रम डाऊनलोड करून ऐकता येतात, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे संगीतही ऐकणे त्यामुळे सुलभ झाले आहे.
बहुतांश पीएमपीचा उपयोग “यूएसबी स्टोरेज’साठी होत असल्याने डाटा ट्रान्सफर अधिक सोपे झाले आहे. त्यासाठी “मेमरी’च्या मर्यादा आहेतच, मात्र त्यावरही “कार्ड स्लॉट’चा उपाय आहे. एकूणच संगीताच्या छंदासाठी साधारणतः दोन-अडीच हजार रुपये खर्चण्यास जे तयार आहेत, त्यांच्यासाठी “पीएमपी’ ही एक सोयच झाली आहे.
———-
चतुरंगी चित्रपटाची चित्तरकथा!
एकच चित्रपट…एकच कथा…त्याच्याही चार आवृत्या. त्यातील दोन आवृत्यांनी चित्रपटाच्या नायकाला नव्या उंचीवर नेले तर दोन चित्रपटांनी मूळ नायकाच्या सृती जागवण्यापलीकडे काहीही साध्य केले नाही. “डॉन’ या चित्रपटाची “चित्तरकथा’ ही अशी दोन ओळींत सांगता येईल. अमिताभ बच्चनच्या संस्मरणीय भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या “डॉन’ची शाहरूख खानने नक्कल केली तेव्हा सर्वांनी चर्चा केली. खाली दक्षिण भारतातही अशीच चर्चा चालू आहे ती “डॉन’च्या तमिळ आवृत्तीबाबत म्हणजेच “बिल्ला’ या चित्रपटाची.
सुमारे 27 वर्षांपूर्वी आलेल्या “डॉन’ या चित्रपटाने अमिताभ बच्चनची बॉलिवूडमध्ये (तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीला हे नाव मिळालेले नव्हते) प्रतिष्ठा उंचावली होती. यशस्वी नायक म्हणून अमिताभ प्रस्थापित झाला असला तरी “डॉन’मुळे त्याच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब झाले. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला हे तर सर्वांनाच माहित आहे. त्यानंतर दक्षिण भारताच्या परंपरेप्रमाणे या चित्रपटाचे “रिमेक’ झाले. त्यातील तमिळ भाषेतील “बिल्ला’ या “रिमेक’ने तिकिट खिडकीवर प्रचंड धंदा केला. त्यावेळी तमिळमधील उगवता नायक असलेल्या रजनीकांतने या चित्रपटात नायकाची भूमिका केली होती. “बिल्ला’च्या यशाचा रजनीकांतला अपेक्षेबाहेर फायदा झाला. तो चित्रपट रजनीकांतच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड मानण्यात येतो. याच चित्रपटाने त्याला सुपरस्टारपद बहाल केले. दक्षिण भारतात तो दक्षिणेचा अमिताभ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याची ती ओळख आजपर्यंत कायम राहिली आहे.
बॉलिवूडचा नवा “किंग’ म्हणून दावा करणाऱ्या शाहरूख खान आणि फरहान अख्तर यांनी गेल्या वर्षी “डॉन’चा रिमेक काढला. त्यावेळी त्यांनी प्रसिद्धीसाठी आणि चित्रपटाच्या यशासाठीही मूळ “डॉन’च्या लोकप्रियतेचा बऱ्यापैकी उपयोग करून घेतला. (तसा तो कोण करून घेत नाही. “सेट मॅक्स’ वाहिनीसुद्धा महिन्यातून दोन-दोनदा त्यासाठीच “डॉन’चे प्रदर्शन करत नसते का?) त्यावेळी काही माध्यमांतून “बिल्ला’बद्दलही चर्चा केली होती. “डॉन’मध्ये “ये मेरा दिल’ गाणे चित्रित झालेल्या हेलननेच “बिल्ला’तील गाण्यातही काम केले होते. शाहरूखच्या “डॉन’पेक्षा रजनीकांतने “बिल्ला’मध्ये अधिक चांगले काम केले होते, या तिच्या मतावरही काही ठिकाणी चर्चा झाली. नव्या चित्रपटाची लोकांनी तारीफ केली तरी अमिताभची सर शाहरूखला नाही यावर त्यांचे एकमत झाले.
एवढे सगळे झाल्यावर “बिल्ला’चा रिमेक झाला नसता तरच नवल. (म्हणजे “डॉन’चा चौथा अवतार!) त्याप्रमाणे नव्या पिढीतील लोकप्रिय अभिनेता अजित याची मुख्य भूमिका असलेला “बिल्ला’ गेल्या आठवड्यात तमिळनाडूत रुजू झाला. याही चित्रपटाला सुरवातीला मोठा प्रतिसाद मिळाला. “शिवाजी’च्या यशाशी त्याची बरोबरी करण्यात येऊ लागली. मात्र याही चित्रपटात प्रेक्षकांनी मूळ “बिल्ला’च्या रजनीकांतची सर अजितला नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे याही अर्थाने रजनीकांत “दक्षिणेतला अमिताभ’ ठरला आहे!