Devdesh's Weblog

Icon

दिसामाजी काहीतरी लिहावे

रजनी2 + रजनी2 = α2

भाग 2

Rajikanth Endhiran एन्दिरन हा शब्द आपल्या ‘यंत्र’चा तमिळ अवतार. वसिगरन या शास्त्रज्ञाने तयार केलेल्या चिट्टी या यंत्रमानवाला जेव्हा मानवी विचार आणि भावना मिळतात, तेव्हा घडणारा अनर्थ एन्दिरन-द रोबो हा चित्रपट आपल्याला दाखवतो. या काळात दाढी व मिशांचं जंजाळ असणारा, नंतर मस्त फ्रेंच कट असणारा, त्यानंतर सफाचट हिप्पीकट, त्यानंतर ट्रेंडी केसांची शैली असणारा…असे एकाहून एक भारी रजनी पडद्यावर येत राहतात. हा सगळा मसाला कमी पडला म्हणून की काय, चित्रपटाच्या शेवटी हजारो रजनी दिसू लागतात. पाहावे तिकडे तोच. अन् हो, गैर-रजनीरसिकांची अडचण होऊ नये, यासाठी चित्रपटात एक नायिकाही आहे.

खरं तर रजनीची कोणतीही लकब नसलेला तीन तासांचा चित्रपट झेलणे अशक्यच होते. मात्र ही कसर भरून काढायला म्हणून की काय, एक नाही दोन नाही हजारो रजनी आपल्या दिमतीला हजर होतात. त्यातच शेवटाच्या काही भागात, जुना रजनी आपल्याला भेटतो. जुना म्हणजे केव्हाचा, तर ’76साली ‘अबूर्व रागङ्गळ’, ‘मुण्ड्रू मुडिचु’, 16 (पदिनारू) वयतिनिले अशा चित्रपटांतून दिसलेला खलनायक रजनी. नकारात्मक भूमिका ही त्याची खासियत. ‘भवानी’मध्ये त्याला सुपरस्टारचं बिरुद चिकटलं आणि तो सामान्यांचा ‘नायक’ बनला. त्यानंतर परत त्याला तशी संधी मिळाली नाही. खूप वर्षांनी रजनीला नकारात्मक भूमिकेत पाहिले. आधी गोंडस गोजिरा असणारा चिट्टी नंतर एकदम ‘मनःपूतं समाचरेत्’ वागू लागतो, तो बदल ‘बॉस’ने असा काही दाखविलाय, की बाकीच्या उणीवा सहज भरून आल्यासारख्या वाटतात.

एन्दिरनमध्ये नायक, खलनायक, डावा नायक, उजवा नायक अशा सर्वच जागा रजनीने व्यापल्या आहेत. सर्व जागा व्यापूनही तो दशांगुळे उरतो. अख्ख्या चित्रपटात बोटावर मोजण्याएवढी दृश्ये असतील ज्यांमध्ये तो दिसत नाही. आता एक रजनी असतानाच जिथे आपली मनोरंजून दमछाक होते, तिथे हजारोंच्या संख्येने दिसणारे रजनी पाहिल्यानंतर काय परिस्थिती होत असणार? तेव्हा दोन रजनी पाहण्याच्या तयारीने गेलेल्याचा आनंद अनंत पटींनी वाढतो. थोडक्यात म्हणजे रजनी² + रजनी² = α²!

यातील रजनीच्या नक्की कुठल्या गोष्टींचं कौतुक करावं आणि अपेक्षा असलेल्या गोष्टी नसल्याची खंत करावी, काही समजतच नाही. आपण ही यादी मनातल्या मनात बनवत असेपर्यंत चित्रपट संपूनही जातो. अलम दुनियेत बदनाम असणारे रजनीचे एकही हातवारे किंवा लकबी नाहीत. रजनीला मोठेपणा देणारे संवाद नाहीत. गेला बाजार रजनीची विनोदी दृश्ये तरी दाखवायचे. एक दोन ठिकाणीच फक्त खास रजनीशैलीच्या विनोदाची झलक दिसते.

केशकर्तनालयात गेलेल्या चिट्टीला तेथील कारागिर विचारतो, "केस कापायचे आहेत का." तो म्हणतो, "नको. विगच आहे.”

रजनीने भरलेला तरीही रजनीविरहीत – मयसभेची तीन तास सफर केल्यानंतरच ही फसवणूक लक्षात येते. असा धोका दिल्याबद्दल रजनीला किंवा शंकरला बोल लावावेत, तर पहिल्याने अगदी भारदस्त अभिनय केला आहे. बोट ठेवायला जागाच ठेवली नाही. दुसऱ्याने तर भारतीय रुपेरी पडद्यावर आजपर्यंत आली नाही, खरोखरच अशी कलाकृती दिली आहे. शेवटच्या अर्धा तासात तर गारूड व्हावं तसं आपण खिळून राहतो. चित्रपटातील रोबोसारखेच सर्वकाही झटक्यात न्याहाळणारे डोळे मिळाले असते तर बरं झालं असतं, असं वाटल्यावाचून राहात नाही. काय तो साप, काय तो अगडबंब गोल, काय तो रणगाडा…आपण फक्त बघत राहायचं. चित्रपट संपल्यानंतर पायऱ्या उतरताना एक तरुण, अर्थातच तमिळ, त्याच्या जोडीदाराला सांगत होता – या चित्रपटांत जेवढे रजनी आहेत तेवढ्या वेळा पाहायला यायचं!

शिवाजीमध्ये शंकरने रजनीच्या व्यक्तिमत्त्वाला भुलून अनेक गोष्टी घुसडल्या होत्या. यात मात्र त्याने कथा एके कथा हाच केंद्र ठेवलाय. या दुकलीने मनोरंजन वाटताना कुठलीही गोष्ट हातची ठेवली नाही. सगळं काही भव्य. पुण्यात हॅरिस पूल आणि लोणावळा व खडकीच्या रेल्वे स्टेशनवर चित्रित केलेली दृश्ये अफलातूनच म्हणावी लागतील. तिकिटाचे अर्धे पैसे या मारामारीत फिटायला हरकत नाही. अप्रतिम हा एकच शब्द त्यांच्यासाठी वापरता येईल. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या शंकरसाठी तंत्रज्ञान हा हातखंडा खेळ होता. शिवाय सुजातासारख्या लेखकाने लिहिलेल्या दोन कादंबऱ्यांचा भक्कम आधार पटकथेला मिळाला असल्यामुळे त्या आघाडीवर एन्दिरन अगदी बळकट झाला आहे. जंटलमनद्वारे भारतीय चित्रपटांमध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्स आणणाऱ्या शंकरने रोबोमध्ये अख्खा चित्रपटच ग्राफिक्सला वाहिला आहे. ही ग्राफिक्स कुठेही खोटी किंवा अनावश्यक वाटत नाहीत, ही दिग्दर्शकाची किमया!

शंकर आणि सन पिक्चर्सने आधीपासूनच हा चित्रपट जागतिक बाजारात खपवण्याचे ध्येय ठेवले होते. त्यामुळे चित्रपटात कुठल्याही जागेचे स्थानिक संदर्भ येत नाही. उलट ‘डिस्टन्स जास्ति’ अशा संवादांतून हिंदीत भाषांतरीत करण्याची सोयच केली आहे. ऑस्कर मिळालेल्या ए. आर. रहमाननेही आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी संगीत दिल्यासारखेच दिले आहे. साहजिकच त्यात तमिळ ठेका नाही. रजनीचे परिचयाचे गाणे हा तमिळनाडूतील स्वतंत्र सोहळा असतो. एन्दिरनमध्येही परिचय गीत आहे, पण त्यात ‘झटका’ नाही. बूम बूम रोबोट आणि किळिमंजारो ही दोन वगळता बाकीची गाणी भारतीय लोकांना कंटाळवाणी वाटतील अशीच आहेत. तरीही तुपकट आवाजात रडणाऱ्या हिंदी गायकांपेक्षा ती सुसह्य आहेत.

(समाप्त)

Filed under: चित्रपट, ,

4 Responses

 1. हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

  सही! मस्त आणि खुपंच छान झाली आहे नोंद! आता चित्रपट पाहायची गरज नाही अस वाटत आहे. पैसे वाचवल्याबद्दल धन्यवाद!!!

 2. देविदास देशपांडे म्हणतो आहे:

  धन्यवाद, हेमंत. मात्र एकदा पहाच हा चित्रपट. रजनीच्या नेहमीच्या लकबी नसल्यी तरी एकूण मनोरंजन भरपूर आहे.

 3. संकेत म्हणतो आहे:

  आम्हीदेखील रजनीदेवाचे पंखे आहोत…. एन्दिरन जबरदस्त बनलाय..speechless… वेगळा रजनी दाखवण्याचे सामर्थ्य शन्करमधेच होते…..city pide, kothrud या multiplex थेटरात पहिल्यांदा शिट्ट्या, टाळ्या, ओरडणे अनुभवले…आतापर्यंत या थेटरात मुकेच चित्रपट बघतात असे वाटायचे… सर्व भारतीयांनी बघावा असा हा सिनेमा.. आता एन्दिरनवर अक्खे पुराण लिहायची इच्छा होतेय. रजनीसंप्रदायी ब्लॉगविश्वावर बघितले की आनन्द होतो…

 4. देविदास देशपांडे म्हणतो आहे:

  धन्यवाद, संकेत.
  तुमचे रजनीपुराण, व्रत आणि माहात्म्य आवर्जून वाचतो मी. रजनीबाबत मी आधी माझ्या डीडीच्या दुनियेत या ब्लॉगवर लिहिले होते.

  city pide, kothrud या multiplex थेटरात पहिल्यांदा शिट्ट्या, टाळ्या, ओरडणे अनुभवले

  शिवाजीच्या वेळेस अशीच मजा आली होती. शुक्रवारी आयनॉक्सला गर्दी असली तरी आरोळ्या आणि शिट्या कमी नव्हत्या. हो. एन्दिरन सर्वांनी पाहायलाच पाहिजे. हॉलिवूडच्या दर्जाचा भारतीय चित्रपट म्हणून त्याची नोंद करावीच लागेल. तरीही एन्दिरन हा रजनीचा कमी आणि शंकरचा अधिक चित्रपट आहे. पुराण लिहायचं तर पडैयप्पा किंवा मुथ्थुवर लिहा. किंवा बाशा एकदम मस्त.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: