Devdesh's Weblog

Icon

दिसामाजी काहीतरी लिहावे

असा बालगंधर्व होणे नाही

        नितीन चंद्रकांत देसाई यांचा बालगंधर्व हा चित्रपट पाहण्यासाठी तब्बल दीड तास प्रतीक्षा तर करावी लागलीच, अर्धा चित्रपट उभ्यानेही पाहावा लागला. चित्रपटाला एवढी गर्दी होती, की प्रत्यक्ष कलावंतांपैकीही काही खाली पायऱ्यांवर बसले होते. मात्र एवढा सगळा खटाटोप या दोन तासांच्या चित्रपटाच्या खेळानंतर सार्थकी लागला, असेच म्हणावे लागेल. बालगंधर्व

       मराठी चित्रसृष्टीत आजवर क्वचितच पाहायला मिळाली, अशी भव्यता आणि काटेकोरपणा या चित्रपटात ठायीठायी बघायला मिळतो. नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या जीवनातील नाट्यमयता आणि अलौलिकता, या दोन्हींचे शिवधनुष्य देसाई, भावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम प्रकारे पेलले आहे.

मराठी साहित्यात प्रसिद्ध असलेल्या संयुक्त संगीत मानापमानच्या प्रसंगात, भामिनी उर्फ बालगंधर्व झालेला सुबोध भावे आणि धैर्यधर उर्फ केशवराव भोसले झालेला राहुल देशपांडे गात असतात. बालगंधर्वांची शैली साधी-सोपी पण भावपूर्ण तर केशवरावांची शैली अगदी शास्त्रोक्त गाण्याची. तर या प्रसंगात तानांवर ताना घेत केशवराव आपली अलौकिक प्रतिभा उलगडत जातात आणि भामिनी झालेले बालगंधर्व त्यांच्या कलेला मनोमन दाद देतात. अगदी स्त्रीसुलभ सहजतेने ते केशवरावांपर्यंत पोचतात, त्यांची तलवार हातात घेतात आणि जोडे आणून त्यांच्या पायात घालतात.

बालगंधर्वांसारखा एक श्रेष्ठ कलाकार अशा रितीने आपल्या पायात जोडे घालतोय, या भावनेने विचलित झालेले केशवराव नकार देतात. मात्र एखाद्या घरंदाज पडदानशीन स्त्रीप्रमाणे बालगंधर्व त्यांना जोडे घालण्याची विनंती करतात. या एका प्रसंगातून बालगंधर्व, केशवराव, राहुल आणि सुबोध एकाच वेळेस रसिकांच्या हृदयात घर करतात.

सुबोधनी ही भूमिका जीवंत केली, असं म्हणणं हेही कमतर होईल. त्या अंधारलेल्या दोन तासांत बालगंधर्वांच्या रुपातील सुबोध उजळून टाकतो. प्रत्येक चौकट अनोखी आणि अद्भूत. बालगंधर्वांचे यशाच्या पायऱ्यांवर पायऱ्या चढणे जितक्या सहजतेने दिसतात तेवढंच उतरणीच्या काळातील त्यांची विकलताही. दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहील, अशी भूमिका यानिमित्ताने सुबोधच्या वाट्याला आली आणि त्याने तिचे सोने केले आहे. कदाचित हीच त्याची ओळखही होऊन गेल्यास नवल नाही, इतका तो एकरुप झाला आहे.

       खुद्द डॉ. श्रीराम लागूंनी खेळ झाल्यावर त्याला मिठी मारून मार्वलसची शाबासकी दिली. यातच सर्व काही आले. मध्यंतरात त्यांच्याशी बोलल्यावर डॉ. लागूही स्मरणरंजनात रंगल्याचे दिसले. “डॉ. सोमण म्हणून होते ज्यांनी बालगंधर्वांना अखेरच्या काळात सांभाळलं. त्यांची देखभाल केली. या डॉ. सोमणांनी एकदा त्यांची खासगी मैफल आयोजित केली होती. तीत मी बालगंधर्वांना पाहिलं. अर्थात त्यावेळी त्यांचे उतारवय होते,”  अशी आठवण त्यांनी सांगितली.

        चि‌त्रपटाला आलेला प्रत्येकजण बालगंधर्वांच्या काळाशी, त्यांच्या कलेशी जणू एकरूप होऊन गेला होता. अन्य मराठी चि‌त्रपटांत न दिसणारा आणखी एक गुण या चित्रपटात दिसतो. तो म्हणजे मुख्य पात्रावर लक्ष केंद्रीत करून अन्य पा‌त्रांना दुर्लक्षित करण्याचा टाळलेला मोह. मुख्य नायकाबरोबरच त्याच्या आयुष्यात आलेली विविध माणसे, त्यांनी टाकलेला प्रभाव याचे अगदी यथातथ्य चित्रण यात दिसत. त्यामुळे अगदी एका प्रसंगापुरता आलेला अनंत कान्हेरे काय किंवा बालगंधर्वांना आर्थिक संकटात ढकलणारा बाळासाहेब पंडित काय, ही पात्रे ठसठशीत लक्षात राहतात.

         चित्रपटातील काही प्रसंग अगदी डोळ्यांचे पारणे फेडतात. उदा. बालगंधर्वांच्या पत्नीने त्यांना स्त्रीरूपात पाहण्याची इच्छा व्यक्त करणे किंवा मध्यंतरापूर्वी येणारा स्त्रीभूमिकांच्या बळावर एक लाखांचे कर्ज फेडण्याचा निर्धार व्यक्त करणारे बालगंधर्व, त्यानंतर पावसाच्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब तुडवित चालणारी बालगंधर्वांची मूर्तींअगदी अप्रतिम.

         आणखी एक बाब म्हणजे चि‌त्रपटाचे संगीत. चि‌त्रपटांतील सर्व पदे जेवढी श्रवणीय तेवढीच देखणी झाली आहेत. बऱ्याच दिवसांनंतर नाट्यसंगीत ऐकण्याची इच्छा निर्माण होईल, अशी पदे तेवढ्याच सुरेल ढंगात ऐकायला मिळाली. त्यासाठी कौशल इनामदार आणि आनंद भाटे या दोघांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

          फक्त खटकणारी बाब म्हणजेहा चि‌त्रपट मराठीपुरता मर्यादीत ठेवण्याची निर्मात्यांची मानसिकता. हा चि‌त्रपट कान किंवा व्हेनिस महोत्सवात जाणार असला, तरी चि‌त्रकृतीची खरी परीक्षा ही रसिकांसमोरच होते. त्यादृष्टीने इंग्रजी, हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये हा चित्रपट जायला हवा होता. यासंदर्भात नितीन देसाईंना प्रश्न केला, तर त्यांचे उत्तर होतेः

          बालगंधर्वांचे मुख्य कार्य मराठीत होते. त्यांना लोकाश्रय मिळाला तोही मराठीत. त्यामुळे आमची प्राथमिकता हा चि‌त्रपट मराठीत आधी आणला. या प्रे‍क्षकांचा प्रतिसाद पाहून मग अन्य भाषांमध्ये सबटायटल्ससह प्रदर्शित करण्यात येईल.” 

 

Filed under: चित्रपट, भाषा, मराठी, महाराष्ट्र

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: