Devdesh's Weblog

Icon

दिसामाजी काहीतरी लिहावे

दोन चित्रपट दोन संस्कृती

sachin-ashok saraf-mahesh kothareजनीकांत अभिनीत आणि शंकर दिग्दर्शित एन्दिरन या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा तीनदा झाला. पहिला तमिळ गाण्यांचा मलेशियात, तेलुगू आवृत्तीसाठीचा हैदराबादला आणि हिंदी आवृत्तीसाठी मुंबईत. त्यातील मलेशियातील सोहळा पाहताना जाणवत होतं, की या कार्यक्रमासाठी कमीत कमी दोन ते तीन कोटी रुपये खर्च झाले असतील. त्याच प्रमाणात चित्रपटाची चर्चाही झाली, प्रसिद्धीही झाली आणि धंदाही झाला.

मराठीतील आघाडीचे तीन नायक पहिल्यांदा एकत्र येत असलेला आयडीयाची कल्पना हा चित्रपट येत्या ३१ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. त्याचा संगीत अनावरण सोहळा रविवारी पुण्यात क्रॉसवर्डमध्ये झाला. तीनही नायक – त्यातील एक चित्रपटाचा दिग्दर्शक आणि सह-संगीतकार – कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. ज्याप्रमाणे एन्दिरन हा तमिळ चित्रसृष्टीसाठी एक मोठा टप्पा होता, त्याचपातळीवर नव्हे पण मराठी चित्रपटांच्या दृष्टीने ही निश्चितच मोठी घटना होती. मराठी चित्रपटांना ज्यावेळी मान टाकली होती, त्यावेळी सचिन आणि महेशनी त्यांना तगविण्यात निःसंशय मोठी भुमिका निभावली. पण क्रॉसवर्डमध्ये त्यावेळी जमलेल्या १००-१५० लोकांव्यतिरिक्त कोणाच्या गावीही नव्हतं, की इथे असा काही कार्यक्रम चालू आहे.

या दोन कार्यक्रमांची तुलना केली, की दाक्षिणात्य आणि मराठी चित्रसंस्कृतीतील फरक ठळकपणे जाणवला. खुद्द सचिन, अशोक सराफ आणि महेश कोठारे या आपलं नाणं तिकीट बारीवर कित्येकदा खणखणीत वाजवलेल्या नायकांनाही हा फरक मान्य असल्याचं त्यांना बोलताना जाणवलं. मात्र त्याचा दोष त्यांनी प्रेक्षकांना दिला.

"दक्षिणेत चित्रपटांना डेडिकेटेड प्रेक्षकवर्ग आहे. ते लोक एकवेळ उपाशी राहतील पण चित्रपट पाहतील. तसा त्यांचा उद्योगही त्याप्रमाणात मोठा आहे. चित्रपट खपविण्यासाठी ते म्हणूनच मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करू शकतात. आपल्याकडे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे किंवा मल्टिप्लेक्सकडे इतक्या सहजपणे जात नाही. त्यामुळे मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांची तुलना होऊ शकत नाही," असं सचिन यांचं म्हणणं होतं. मात्र त्याच वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्याची ताकद असलेले चित्रपट कमी निर्माण होत आहेत, हेही त्यांना मान्य आहे. "चित्रपट चांगला असेल, तर लोक आपोआप येतात. मात्र आपणच चांगले चित्रपट बनवायचे नाहीत आणि नंतर लोक येत नाहीत म्हणून ओरड करायची, याला काही अर्थ नाही," असं ते म्हणाले.

प्रेक्षकांबाबतची ही तक्रार अशोक सराफ यांचीही आहे. "सरकारने विविघ योजना सुरू केल्या. जे काही करायचे ते केले. तरीही मराठी चित्रपटांची स्थिती सुधारली आहे, असं दिसत नाही. याचं कारण प्रेक्षकच मुळात चित्रपटांना येत नाहीत," असं सराफ यांचं म्हणणं. मराठी चित्रपटांना अलिकडे चांगले दिवस आल्याची चर्चा आहे. तेही सराफ यांना मान्य नाही.

"मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत, असं म्हटलं जातं. कारण चित्रपट निर्मितीचे प्रमाण वाढलंय. ढिगाने चित्रपट येतायत. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सुधारलेत, कलाकारांना काम मिळतंय…अशा सर्व गोष्टी खऱ्या आहेत. पण मुळात चित्रपट पाहायला लोक आहेत का, हा खरा मुद्दा आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले म्हणणं फारसं खरं नाही," हा त्यांचा मुद्दा.

गंमत म्हणजे सचिन, महेश कोठारे आणि अशोक सराफ या तिघांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख तयार केलेली होती. मात्र हिंदीपेक्षा मराठीतच काम करणं तिघांनीही पसंत केलं आहे. कारण हिंदीत काम केल्याने समाधान मिळत नसल्याचं तिघांचंही म्हणणं पडलं होतं. त्यातील सराफ यांनी हिंदीतील काम पूर्णपणे थांबविलं आहे. कोठारे मात्र त्यांच्या मुलाला हिरो म्हणून सादर करण्यासाठी जानेवारीत हिंदी चित्रपट काढणार आहेत.

"हिंदीत आमच्या मनाजोगतं काम मिळत नाही. शिवाय मराठीत काम करणं आम्हाला अधिक सोयीचं वाटतं. We feel at home while working in Marathi," असं सचिनचं म्हणणं, तर हा बांधिलकीचा प्रश्न असल्याचं कोठारे यांचं म्हणणं. मात्र अशोक सराफ यांचं मत काहीसं वेगळं पडलं. "हिंदीत मला त्याच त्याच भूमिका मिळत होत्या. आपल्या मराठीतील विनोद आणि हिंदीतील विनोदाची तुलना केली, तर त्यातल्या दर्जातील फरक तुम्हाला कळून येईल. मनाला समाधान न देणारी अशी कामे करायची नाहीत, हे मी ठरविलं," असं त्यांनी सांगितलं.

Filed under: चित्रपट, भाषा, मराठी, ,

रजनी2 + रजनी2 = α2

भाग 2

Rajikanth Endhiran एन्दिरन हा शब्द आपल्या ‘यंत्र’चा तमिळ अवतार. वसिगरन या शास्त्रज्ञाने तयार केलेल्या चिट्टी या यंत्रमानवाला जेव्हा मानवी विचार आणि भावना मिळतात, तेव्हा घडणारा अनर्थ एन्दिरन-द रोबो हा चित्रपट आपल्याला दाखवतो. या काळात दाढी व मिशांचं जंजाळ असणारा, नंतर मस्त फ्रेंच कट असणारा, त्यानंतर सफाचट हिप्पीकट, त्यानंतर ट्रेंडी केसांची शैली असणारा…असे एकाहून एक भारी रजनी पडद्यावर येत राहतात. हा सगळा मसाला कमी पडला म्हणून की काय, चित्रपटाच्या शेवटी हजारो रजनी दिसू लागतात. पाहावे तिकडे तोच. अन् हो, गैर-रजनीरसिकांची अडचण होऊ नये, यासाठी चित्रपटात एक नायिकाही आहे.

खरं तर रजनीची कोणतीही लकब नसलेला तीन तासांचा चित्रपट झेलणे अशक्यच होते. मात्र ही कसर भरून काढायला म्हणून की काय, एक नाही दोन नाही हजारो रजनी आपल्या दिमतीला हजर होतात. त्यातच शेवटाच्या काही भागात, जुना रजनी आपल्याला भेटतो. जुना म्हणजे केव्हाचा, तर ’76साली ‘अबूर्व रागङ्गळ’, ‘मुण्ड्रू मुडिचु’, 16 (पदिनारू) वयतिनिले अशा चित्रपटांतून दिसलेला खलनायक रजनी. नकारात्मक भूमिका ही त्याची खासियत. ‘भवानी’मध्ये त्याला सुपरस्टारचं बिरुद चिकटलं आणि तो सामान्यांचा ‘नायक’ बनला. त्यानंतर परत त्याला तशी संधी मिळाली नाही. खूप वर्षांनी रजनीला नकारात्मक भूमिकेत पाहिले. आधी गोंडस गोजिरा असणारा चिट्टी नंतर एकदम ‘मनःपूतं समाचरेत्’ वागू लागतो, तो बदल ‘बॉस’ने असा काही दाखविलाय, की बाकीच्या उणीवा सहज भरून आल्यासारख्या वाटतात.

एन्दिरनमध्ये नायक, खलनायक, डावा नायक, उजवा नायक अशा सर्वच जागा रजनीने व्यापल्या आहेत. सर्व जागा व्यापूनही तो दशांगुळे उरतो. अख्ख्या चित्रपटात बोटावर मोजण्याएवढी दृश्ये असतील ज्यांमध्ये तो दिसत नाही. आता एक रजनी असतानाच जिथे आपली मनोरंजून दमछाक होते, तिथे हजारोंच्या संख्येने दिसणारे रजनी पाहिल्यानंतर काय परिस्थिती होत असणार? तेव्हा दोन रजनी पाहण्याच्या तयारीने गेलेल्याचा आनंद अनंत पटींनी वाढतो. थोडक्यात म्हणजे रजनी² + रजनी² = α²!

यातील रजनीच्या नक्की कुठल्या गोष्टींचं कौतुक करावं आणि अपेक्षा असलेल्या गोष्टी नसल्याची खंत करावी, काही समजतच नाही. आपण ही यादी मनातल्या मनात बनवत असेपर्यंत चित्रपट संपूनही जातो. अलम दुनियेत बदनाम असणारे रजनीचे एकही हातवारे किंवा लकबी नाहीत. रजनीला मोठेपणा देणारे संवाद नाहीत. गेला बाजार रजनीची विनोदी दृश्ये तरी दाखवायचे. एक दोन ठिकाणीच फक्त खास रजनीशैलीच्या विनोदाची झलक दिसते.

केशकर्तनालयात गेलेल्या चिट्टीला तेथील कारागिर विचारतो, "केस कापायचे आहेत का." तो म्हणतो, "नको. विगच आहे.”

रजनीने भरलेला तरीही रजनीविरहीत – मयसभेची तीन तास सफर केल्यानंतरच ही फसवणूक लक्षात येते. असा धोका दिल्याबद्दल रजनीला किंवा शंकरला बोल लावावेत, तर पहिल्याने अगदी भारदस्त अभिनय केला आहे. बोट ठेवायला जागाच ठेवली नाही. दुसऱ्याने तर भारतीय रुपेरी पडद्यावर आजपर्यंत आली नाही, खरोखरच अशी कलाकृती दिली आहे. शेवटच्या अर्धा तासात तर गारूड व्हावं तसं आपण खिळून राहतो. चित्रपटातील रोबोसारखेच सर्वकाही झटक्यात न्याहाळणारे डोळे मिळाले असते तर बरं झालं असतं, असं वाटल्यावाचून राहात नाही. काय तो साप, काय तो अगडबंब गोल, काय तो रणगाडा…आपण फक्त बघत राहायचं. चित्रपट संपल्यानंतर पायऱ्या उतरताना एक तरुण, अर्थातच तमिळ, त्याच्या जोडीदाराला सांगत होता – या चित्रपटांत जेवढे रजनी आहेत तेवढ्या वेळा पाहायला यायचं!

शिवाजीमध्ये शंकरने रजनीच्या व्यक्तिमत्त्वाला भुलून अनेक गोष्टी घुसडल्या होत्या. यात मात्र त्याने कथा एके कथा हाच केंद्र ठेवलाय. या दुकलीने मनोरंजन वाटताना कुठलीही गोष्ट हातची ठेवली नाही. सगळं काही भव्य. पुण्यात हॅरिस पूल आणि लोणावळा व खडकीच्या रेल्वे स्टेशनवर चित्रित केलेली दृश्ये अफलातूनच म्हणावी लागतील. तिकिटाचे अर्धे पैसे या मारामारीत फिटायला हरकत नाही. अप्रतिम हा एकच शब्द त्यांच्यासाठी वापरता येईल. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या शंकरसाठी तंत्रज्ञान हा हातखंडा खेळ होता. शिवाय सुजातासारख्या लेखकाने लिहिलेल्या दोन कादंबऱ्यांचा भक्कम आधार पटकथेला मिळाला असल्यामुळे त्या आघाडीवर एन्दिरन अगदी बळकट झाला आहे. जंटलमनद्वारे भारतीय चित्रपटांमध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्स आणणाऱ्या शंकरने रोबोमध्ये अख्खा चित्रपटच ग्राफिक्सला वाहिला आहे. ही ग्राफिक्स कुठेही खोटी किंवा अनावश्यक वाटत नाहीत, ही दिग्दर्शकाची किमया!

शंकर आणि सन पिक्चर्सने आधीपासूनच हा चित्रपट जागतिक बाजारात खपवण्याचे ध्येय ठेवले होते. त्यामुळे चित्रपटात कुठल्याही जागेचे स्थानिक संदर्भ येत नाही. उलट ‘डिस्टन्स जास्ति’ अशा संवादांतून हिंदीत भाषांतरीत करण्याची सोयच केली आहे. ऑस्कर मिळालेल्या ए. आर. रहमाननेही आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी संगीत दिल्यासारखेच दिले आहे. साहजिकच त्यात तमिळ ठेका नाही. रजनीचे परिचयाचे गाणे हा तमिळनाडूतील स्वतंत्र सोहळा असतो. एन्दिरनमध्येही परिचय गीत आहे, पण त्यात ‘झटका’ नाही. बूम बूम रोबोट आणि किळिमंजारो ही दोन वगळता बाकीची गाणी भारतीय लोकांना कंटाळवाणी वाटतील अशीच आहेत. तरीही तुपकट आवाजात रडणाऱ्या हिंदी गायकांपेक्षा ती सुसह्य आहेत.

(समाप्त)

Filed under: चित्रपट, ,

रजनी2 + रजनी2 = α2

भाग 1

रजनीरकांत एन्दिरन-द रोबो शास्त्रज्ञांच्या सभेत रजनीच्याच रूपातील एन्दिरन सादर करण्यात येतो. त्यात भरलेल्या माहितीची चुणूक घेतल्यानंतर, अधिकची परीक्षा म्हणून एक शास्त्रज्ञ त्याला विचारतो, देव आहे का नाही.

एन्दिरन त्याला विचारतो, "देव म्हणजे काय"

“जो आपल्याला घडवतो (बनवतो) तो देव” – शास्त्रज्ञ

"मग याने मला घडवलंय. हाच माझा देव."

या वाक्यासरशी त्याचे हात वळतात शास्त्रज्ञ असलेल्या खऱ्या रजनीकांतकडे. दृश्य संपण्याच्या आत अख्ख्या चित्रपटगृहात शिट्या, टाळ्या आणि आरोळ्यांचा एकच गलका होतो.

हे एक दृश्य सोडल्यास एन्दिरन-द रोबो या चित्रपटगृहात रजनीकांतच्या चित्रपटाचे एकही लक्षण नाही. रजनीच्या चित्रपटांमध्ये आमच्यासारख्या रसिकांसाठी ज्या खास जागा ठेवलेल्या असतात, त्यांचा मागमूसही रोबोमध्ये नाही. आता हे विधान करण्याआधी रजनीच्या चित्रपटांतील अशा जागा कोणत्या, हे सांगावे लागेल. सांबार करताना त्यात इतर कितीही भाज्या असल्या तरी शेवग्याच्या शेंगा असल्याशिवाय त्याला सांबार म्हणत नाहीत. तसेच रजनीचा कुठलाही चित्रपट येतो, तेव्हा त्यात खालील गोष्टी नसतील तर तो मानण्यात येतो.

 • सुभाषिते आणि आध्यात्मिक वाक्यांनी भरलेले परिचय गाणे. हे गाणे फक्त एस पी ‘बाप’सुब्रमण्यमच्याच आवाजात पाहिजे.

 • पहिल्या एक तासात कुठल्यातरी मोठ्या संकटांचा सामना करणारा नायक (हा केवळ आणि केवळ रजनी. अन्य कोणीही चालणार नाही.)

 • आपल्या बुद्धीकौशल्यावर आणि अचाट करामतींनी शत्रूवर डाव उलटवणारा रजनी. यात कुठेतरी गॉगल, काडेपेटी किंवा अन्य कुठलीही भौतिक वस्तू जगावेगळ्या लकबींसह हाताळण्याची अदा.

 • सामान्य माणसाच्या परिस्थितीतून श्रीमंत होणारा रजनी. यादरम्यान वैयक्तिक रजनी, राजकीय परिस्थीती आणि त्याचे मोठेपण यांवर रोख धरणारे फाकडू संवाद. शिवाय त्याच्या मागे लागलेली आणि गळ्यात पडलेली नायिका.-

 • सरतेशेवटी शत्रूला चितपट करून परत सामान्य परिस्थितीचा अंगीकार करणारा रजनी.

यातील एखादा जरी पदार्थ कमी पडला, तरी रजनीच्या चित्रपटाची भट्टी जमत नाही. त्यामुळेच तर ‘बाबा’सारखा चित्रपट परिचयाचे गाणे एसपी ऐवजी शंकर महादेवनच्या आवाजात असल्याने प्रेक्षकांना रूचला नाही. त्यानंतर चंद्रमुखी आणि शिवाजीत मात्र एसपीचा आवाज असल्याने चित्रपटांनी तुफान धंदा केला. एन्दिरनमध्ये मात्र यांपैकी काही नाही.

न कैफेदर्द न इरफानेसुलूक न हुस्नेसलूक

महज बयाने वाकया हो तो कहानी क्या

हा इतका नॉर्मल चित्रपट आहे, की हिंदीतला कुठलाही ठोकळा तिथे फिट्ट बसला असता. अनेक निर्मात्यांच्या आणि नटमुलांच्या चुली त्यावर पेटल्या असत्या. तरीही रोबो हा सामान्य चित्रपट नाही. कसा ते सांगतो. त्याआधी आपण आधी पार्श्वभूमी पाहू.

रजनीचा चित्रपट लागणार हे कळाल्यावर तो पहिल्या दिवशी पाहिलाच पाहिजे, हे ओघाने आलंच. शिवाजीच्या वेळेस परिस्थिती सोपी होती. चित्रपट फक्त तमिळमध्ये येणार होता. यावेळी मात्र हिंदी आवृत्तीही येणार असल्याने कुठला पाहणार, असा माझ्यासमोर किंचितही नसलेला प्रश्न लोकांनी उपस्थित करायला सुरवात केली. माझ्यापुरते त्याचे उत्तर होते.

When you can kiss the mistress, don’t flirt with maid.

तमिळ येत असताना हिंदी आवृत्ती कोणी पाहतं का. अशी पापं करणं खूप पूर्वी सोडून दिलंय. मात्र एन्दिरन येणार कधी, हेच माहीत नव्हतं. तो पुढच्या आठवड्यात येणार आहे, असंच गृहीत धरून चाललो होतो. काल बेसावध असल्यामुळे तिकिट मिळेल का नाही, याचीही खात्री नव्हती. त्यामुळे कार्यालयातील फहीमच्या सहकार्याने सकाळीच दोन तिकिटे राखून ठेवली. ऐनवेळी त्याने येणार नाही म्हणून सांगितले. मग कार्यालयातीलच संदेश पवारला सोबत घेऊन गेलो.

मराठा तितुका मेळवावा।रजनीकांत दाखवावा।।

हे तर आपले ब्रीदच आहे. संदेशलाही रजनीकांतच्या जुन्या चित्रपटांची बऱ्यापैकी ओळख असल्याने त्यालाही उत्सुकता होतीच.

अशा परिस्थितीत रोबो पाहण्यासाठी थेटरात पाय ठेवला. (मल्टिप्लेक्स म्हणून काय झाले. थेटरच ते!) 150 कोटी रुपयांचा खर्च, हे न ते याच्याशी आम्हाला देणंघेणं नव्हतं. आता तीन तास पैसा वसूल मनोरंजन होणार, ही गाठ मनाशी बांधलेल्या लोकांना करायचंय काय साय-फाय आणि वाय-फाय?

(क्रमशः)

Filed under: चित्रपट, ,

इमेल नोंदवा

Join 495 other followers

RSS डीडीच्या दुनियेत

 • BJP Manages a Respite, But for How Long?
  Thus, even if the BJP manages to install Sawant as CM, he will still face constant threat of being dismantled by opposition Congress and dissidents. Therefore, the drama will only get interesting in coming days.
 • नाकारों के नकारों पर सवार कांग्रेस
  एक पूरी पार्टी की पार्टी एक ही परिवार पर निर्भर हो और जनाधार रखने वाले नेताओं का अकाल हो तो वास्तविकता को नकारनेवाले नेताओं की तूती तो बोलेगी ही। ऐसे नकारों पर सवार कांग्रेस की नैया डूबना तय है। […]
 • NCP’s List of Candidates Adds to Conundrum
  These frequent somersaults from the veteran leader has left the observers gaping in awe as Pawar is known for political acumen and apt decision making.
 • Priyanka Slams Narendra Modi – An Honest Rendering of a Borrowed Script
  It also becomes laughable when one looks at the pathetic condition her party is in. obviously, Priyanka must be worried about the situation of her party rather than the country because it is the former that is in predicament right now.
 • Ayodhya Verdict – Another Tactic to Delay the Inevitable?
  In this scenario, even though this has raised the hope for a decision on the long pending case in a stipulated time frame, that possibility still remains a pipe dream because any fruitful from this mediation exercise is not guaranteed. So as of now, it seems that all this mediation thing is just a ploy for buying some time till elections are announced.

Twitter Updates

 • RT @DevidasDesh: What should I say, friend! The work is going on fine from home! But I miss the pleasure of scolding the juniors! #Sanskrit3 months ago
 • RT @DevidasDesh: Good that your mouth has been shut. This way at least your blabbering has stopped. This is a godsend cover for ignorance.… 4 months ago
 • RT @DevidasDesh: "All old programs are coming to visit again. I fear whether 'Interruption' board will return again." Those who watched #Do4 months ago
 • अभिमन्यू आणि रिप व्हॅन व्हिंकल - आजच्या #मराठी #भाषा दिनानिमित्ताने हिंदुस्तान टाईम्स मराठी @HTMarathi संकेेतस्थळाव… twitter.com/i/web/status/1… 5 months ago
 • 'माझी भाषा भविष्याची भाषा' या माझ्या नव्या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020 रोजी होत आहे. नवी पेठेतील… twitter.com/i/web/status/1… 5 months ago

संग्रह

ऑगस्ट 2020
सो मं बु गु शु
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

मराठी ब्लॉगविश्व

%d bloggers like this: