Devdesh's Weblog

चिन्ह

दिसामाजी काहीतरी लिहावे

संप पत्रकारांचा

सुडडॉयट्शे त्साईटुंग सगळ्या जगाची उठाठेव करणाऱ्या पत्रकारांचीही स्वतःची काही दुःखे असतात आणि त्यांनाही मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे. अर्थात इतका बाणेदारपणा आपल्या प्रगत आणि स्वाभिमानी महाराष्ट्र भूमीत दिसून यायचा नाही. जर्मनीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. तिथे पत्रकारांनी आपल्या मागण्यांसाठी व अन्यायाच्या विरोधात संप केला आणि वर्तमानपत्राला आपली किंमत जाणवून दिली.

 म्युन्षेनमधील सुडडॉयट्शे त्साईटुंगच्या (Suddeutsche Zeitung) १५० हून अधिक पत्रकारांनी पाच मे रोजी एक दिवसाचा संप केला. जर्मन असोसिएशन ऑफ जर्नलिस्ट्सने (डॉयट्शर युर्टनलिस्टेन फरबाण्डडीजेव्ही) संपाची हाक दिली होती.

 वार्ताहर, उपसंपादक आणि छपाई कर्मचारी संपावर गेल्यामुळे वर्तमानपत्राच्या कार्यालयात केवळ वरिष्ठ संपादकीय कर्मचारी उरले होते. त्याचा परिणाम असा झाला, की सुडडॉयट्शे त्साईटुंगचा अंक त्यादिवशी नेहमीपेक्षा छोट्या आकाराचा आणि मुख्यतः वृत्तसंस्थेच्या बातम्यांनी भरलेला असा काढावा लागला. अन्य दिवसांपेक्षा कमी ताज्या बातम्या असलेला आणि वेगळ्या स्वरूपाचा अंक छापावा लागत असल्याची सूचनाच मुळी वर्तमानपत्राला छापावी लागली.

 वृत्तपत्राची मालक संस्था सुडडॉयट्शे त्साईटुंग जीएमबीएचने पत्रकारांच्या वेतनात कपात करून त्यांचे कामाचे तास वाढविल्यामुळे पत्रकार नाराज आहेत. जर्मनीतील प्रथेप्रमाणे या पत्रकारांना वर्षभरात बारा महिन्यांऐवजी पावणे चौदा महिन्यांचा पगार मिळतो. आपल्याकडील दिवाळीच्या बोनसप्रमाणे हा अतिरिक्त पैसा मिळतो आणि त्याला नावही वाईह्ननाख्ट्सगेल्ड म्हणजे नाताळाचा पैसा असेच आहे.

 मालक संस्थेच्या योजनेप्रमाणे ही रक्कम तेरा महिन्यांच्या पगाराएवढी होणार आहे. त्याचसोबत कामाचे तास दर आठवड्याला ३६.५ तासांवरून ४० तासांवर नेण्याचीही योजना आहे. त्याशिवाय नवीन भरती होणाऱ्या पत्रकारांच्या सुरवातीच्या वेतनात कपातीची योजनाही आखण्यात आली होती.

Filed under: काही लेख

असा बालगंधर्व होणे नाही

        नितीन चंद्रकांत देसाई यांचा बालगंधर्व हा चित्रपट पाहण्यासाठी तब्बल दीड तास प्रतीक्षा तर करावी लागलीच, अर्धा चित्रपट उभ्यानेही पाहावा लागला. चित्रपटाला एवढी गर्दी होती, की प्रत्यक्ष कलावंतांपैकीही काही खाली पायऱ्यांवर बसले होते. मात्र एवढा सगळा खटाटोप या दोन तासांच्या चित्रपटाच्या खेळानंतर सार्थकी लागला, असेच म्हणावे लागेल. बालगंधर्व

       मराठी चित्रसृष्टीत आजवर क्वचितच पाहायला मिळाली, अशी भव्यता आणि काटेकोरपणा या चित्रपटात ठायीठायी बघायला मिळतो. नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या जीवनातील नाट्यमयता आणि अलौलिकता, या दोन्हींचे शिवधनुष्य देसाई, भावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम प्रकारे पेलले आहे.

मराठी साहित्यात प्रसिद्ध असलेल्या संयुक्त संगीत मानापमानच्या प्रसंगात, भामिनी उर्फ बालगंधर्व झालेला सुबोध भावे आणि धैर्यधर उर्फ केशवराव भोसले झालेला राहुल देशपांडे गात असतात. बालगंधर्वांची शैली साधी-सोपी पण भावपूर्ण तर केशवरावांची शैली अगदी शास्त्रोक्त गाण्याची. तर या प्रसंगात तानांवर ताना घेत केशवराव आपली अलौकिक प्रतिभा उलगडत जातात आणि भामिनी झालेले बालगंधर्व त्यांच्या कलेला मनोमन दाद देतात. अगदी स्त्रीसुलभ सहजतेने ते केशवरावांपर्यंत पोचतात, त्यांची तलवार हातात घेतात आणि जोडे आणून त्यांच्या पायात घालतात.

बालगंधर्वांसारखा एक श्रेष्ठ कलाकार अशा रितीने आपल्या पायात जोडे घालतोय, या भावनेने विचलित झालेले केशवराव नकार देतात. मात्र एखाद्या घरंदाज पडदानशीन स्त्रीप्रमाणे बालगंधर्व त्यांना जोडे घालण्याची विनंती करतात. या एका प्रसंगातून बालगंधर्व, केशवराव, राहुल आणि सुबोध एकाच वेळेस रसिकांच्या हृदयात घर करतात.

सुबोधनी ही भूमिका जीवंत केली, असं म्हणणं हेही कमतर होईल. त्या अंधारलेल्या दोन तासांत बालगंधर्वांच्या रुपातील सुबोध उजळून टाकतो. प्रत्येक चौकट अनोखी आणि अद्भूत. बालगंधर्वांचे यशाच्या पायऱ्यांवर पायऱ्या चढणे जितक्या सहजतेने दिसतात तेवढंच उतरणीच्या काळातील त्यांची विकलताही. दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहील, अशी भूमिका यानिमित्ताने सुबोधच्या वाट्याला आली आणि त्याने तिचे सोने केले आहे. कदाचित हीच त्याची ओळखही होऊन गेल्यास नवल नाही, इतका तो एकरुप झाला आहे.

       खुद्द डॉ. श्रीराम लागूंनी खेळ झाल्यावर त्याला मिठी मारून मार्वलसची शाबासकी दिली. यातच सर्व काही आले. मध्यंतरात त्यांच्याशी बोलल्यावर डॉ. लागूही स्मरणरंजनात रंगल्याचे दिसले. “डॉ. सोमण म्हणून होते ज्यांनी बालगंधर्वांना अखेरच्या काळात सांभाळलं. त्यांची देखभाल केली. या डॉ. सोमणांनी एकदा त्यांची खासगी मैफल आयोजित केली होती. तीत मी बालगंधर्वांना पाहिलं. अर्थात त्यावेळी त्यांचे उतारवय होते,”  अशी आठवण त्यांनी सांगितली.

        चि‌त्रपटाला आलेला प्रत्येकजण बालगंधर्वांच्या काळाशी, त्यांच्या कलेशी जणू एकरूप होऊन गेला होता. अन्य मराठी चि‌त्रपटांत न दिसणारा आणखी एक गुण या चित्रपटात दिसतो. तो म्हणजे मुख्य पात्रावर लक्ष केंद्रीत करून अन्य पा‌त्रांना दुर्लक्षित करण्याचा टाळलेला मोह. मुख्य नायकाबरोबरच त्याच्या आयुष्यात आलेली विविध माणसे, त्यांनी टाकलेला प्रभाव याचे अगदी यथातथ्य चित्रण यात दिसत. त्यामुळे अगदी एका प्रसंगापुरता आलेला अनंत कान्हेरे काय किंवा बालगंधर्वांना आर्थिक संकटात ढकलणारा बाळासाहेब पंडित काय, ही पात्रे ठसठशीत लक्षात राहतात.

         चित्रपटातील काही प्रसंग अगदी डोळ्यांचे पारणे फेडतात. उदा. बालगंधर्वांच्या पत्नीने त्यांना स्त्रीरूपात पाहण्याची इच्छा व्यक्त करणे किंवा मध्यंतरापूर्वी येणारा स्त्रीभूमिकांच्या बळावर एक लाखांचे कर्ज फेडण्याचा निर्धार व्यक्त करणारे बालगंधर्व, त्यानंतर पावसाच्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब तुडवित चालणारी बालगंधर्वांची मूर्तींअगदी अप्रतिम.

         आणखी एक बाब म्हणजे चि‌त्रपटाचे संगीत. चि‌त्रपटांतील सर्व पदे जेवढी श्रवणीय तेवढीच देखणी झाली आहेत. बऱ्याच दिवसांनंतर नाट्यसंगीत ऐकण्याची इच्छा निर्माण होईल, अशी पदे तेवढ्याच सुरेल ढंगात ऐकायला मिळाली. त्यासाठी कौशल इनामदार आणि आनंद भाटे या दोघांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

          फक्त खटकणारी बाब म्हणजेहा चि‌त्रपट मराठीपुरता मर्यादीत ठेवण्याची निर्मात्यांची मानसिकता. हा चि‌त्रपट कान किंवा व्हेनिस महोत्सवात जाणार असला, तरी चि‌त्रकृतीची खरी परीक्षा ही रसिकांसमोरच होते. त्यादृष्टीने इंग्रजी, हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये हा चित्रपट जायला हवा होता. यासंदर्भात नितीन देसाईंना प्रश्न केला, तर त्यांचे उत्तर होतेः

          बालगंधर्वांचे मुख्य कार्य मराठीत होते. त्यांना लोकाश्रय मिळाला तोही मराठीत. त्यामुळे आमची प्राथमिकता हा चि‌त्रपट मराठीत आधी आणला. या प्रे‍क्षकांचा प्रतिसाद पाहून मग अन्य भाषांमध्ये सबटायटल्ससह प्रदर्शित करण्यात येईल.” 

 

Filed under: चित्रपट, भाषा, मराठी, महाराष्ट्र

दोन चित्रपट दोन संस्कृती

sachin-ashok saraf-mahesh kothareजनीकांत अभिनीत आणि शंकर दिग्दर्शित एन्दिरन या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा तीनदा झाला. पहिला तमिळ गाण्यांचा मलेशियात, तेलुगू आवृत्तीसाठीचा हैदराबादला आणि हिंदी आवृत्तीसाठी मुंबईत. त्यातील मलेशियातील सोहळा पाहताना जाणवत होतं, की या कार्यक्रमासाठी कमीत कमी दोन ते तीन कोटी रुपये खर्च झाले असतील. त्याच प्रमाणात चित्रपटाची चर्चाही झाली, प्रसिद्धीही झाली आणि धंदाही झाला.

मराठीतील आघाडीचे तीन नायक पहिल्यांदा एकत्र येत असलेला आयडीयाची कल्पना हा चित्रपट येत्या ३१ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. त्याचा संगीत अनावरण सोहळा रविवारी पुण्यात क्रॉसवर्डमध्ये झाला. तीनही नायक – त्यातील एक चित्रपटाचा दिग्दर्शक आणि सह-संगीतकार – कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. ज्याप्रमाणे एन्दिरन हा तमिळ चित्रसृष्टीसाठी एक मोठा टप्पा होता, त्याचपातळीवर नव्हे पण मराठी चित्रपटांच्या दृष्टीने ही निश्चितच मोठी घटना होती. मराठी चित्रपटांना ज्यावेळी मान टाकली होती, त्यावेळी सचिन आणि महेशनी त्यांना तगविण्यात निःसंशय मोठी भुमिका निभावली. पण क्रॉसवर्डमध्ये त्यावेळी जमलेल्या १००-१५० लोकांव्यतिरिक्त कोणाच्या गावीही नव्हतं, की इथे असा काही कार्यक्रम चालू आहे.

या दोन कार्यक्रमांची तुलना केली, की दाक्षिणात्य आणि मराठी चित्रसंस्कृतीतील फरक ठळकपणे जाणवला. खुद्द सचिन, अशोक सराफ आणि महेश कोठारे या आपलं नाणं तिकीट बारीवर कित्येकदा खणखणीत वाजवलेल्या नायकांनाही हा फरक मान्य असल्याचं त्यांना बोलताना जाणवलं. मात्र त्याचा दोष त्यांनी प्रेक्षकांना दिला.

"दक्षिणेत चित्रपटांना डेडिकेटेड प्रेक्षकवर्ग आहे. ते लोक एकवेळ उपाशी राहतील पण चित्रपट पाहतील. तसा त्यांचा उद्योगही त्याप्रमाणात मोठा आहे. चित्रपट खपविण्यासाठी ते म्हणूनच मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करू शकतात. आपल्याकडे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे किंवा मल्टिप्लेक्सकडे इतक्या सहजपणे जात नाही. त्यामुळे मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांची तुलना होऊ शकत नाही," असं सचिन यांचं म्हणणं होतं. मात्र त्याच वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्याची ताकद असलेले चित्रपट कमी निर्माण होत आहेत, हेही त्यांना मान्य आहे. "चित्रपट चांगला असेल, तर लोक आपोआप येतात. मात्र आपणच चांगले चित्रपट बनवायचे नाहीत आणि नंतर लोक येत नाहीत म्हणून ओरड करायची, याला काही अर्थ नाही," असं ते म्हणाले.

प्रेक्षकांबाबतची ही तक्रार अशोक सराफ यांचीही आहे. "सरकारने विविघ योजना सुरू केल्या. जे काही करायचे ते केले. तरीही मराठी चित्रपटांची स्थिती सुधारली आहे, असं दिसत नाही. याचं कारण प्रेक्षकच मुळात चित्रपटांना येत नाहीत," असं सराफ यांचं म्हणणं. मराठी चित्रपटांना अलिकडे चांगले दिवस आल्याची चर्चा आहे. तेही सराफ यांना मान्य नाही.

"मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत, असं म्हटलं जातं. कारण चित्रपट निर्मितीचे प्रमाण वाढलंय. ढिगाने चित्रपट येतायत. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सुधारलेत, कलाकारांना काम मिळतंय…अशा सर्व गोष्टी खऱ्या आहेत. पण मुळात चित्रपट पाहायला लोक आहेत का, हा खरा मुद्दा आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले म्हणणं फारसं खरं नाही," हा त्यांचा मुद्दा.

गंमत म्हणजे सचिन, महेश कोठारे आणि अशोक सराफ या तिघांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख तयार केलेली होती. मात्र हिंदीपेक्षा मराठीतच काम करणं तिघांनीही पसंत केलं आहे. कारण हिंदीत काम केल्याने समाधान मिळत नसल्याचं तिघांचंही म्हणणं पडलं होतं. त्यातील सराफ यांनी हिंदीतील काम पूर्णपणे थांबविलं आहे. कोठारे मात्र त्यांच्या मुलाला हिरो म्हणून सादर करण्यासाठी जानेवारीत हिंदी चित्रपट काढणार आहेत.

"हिंदीत आमच्या मनाजोगतं काम मिळत नाही. शिवाय मराठीत काम करणं आम्हाला अधिक सोयीचं वाटतं. We feel at home while working in Marathi," असं सचिनचं म्हणणं, तर हा बांधिलकीचा प्रश्न असल्याचं कोठारे यांचं म्हणणं. मात्र अशोक सराफ यांचं मत काहीसं वेगळं पडलं. "हिंदीत मला त्याच त्याच भूमिका मिळत होत्या. आपल्या मराठीतील विनोद आणि हिंदीतील विनोदाची तुलना केली, तर त्यातल्या दर्जातील फरक तुम्हाला कळून येईल. मनाला समाधान न देणारी अशी कामे करायची नाहीत, हे मी ठरविलं," असं त्यांनी सांगितलं.

Filed under: चित्रपट, भाषा, मराठी, ,